२०० फूट जमीन पाण्याखाली; अनेक घरांची पडझड झाल्याने ग्रामस्थ भयभीत
विरारजवळील ऐतिहासिक अर्नाळा किल्ला असलेल्या बेटावरील अर्नाळा गाव खचत चालल्याने येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या बेटाचा २०० फुटांपेक्षा अधिक भाग पाण्याखाली गेला आहे. येथे धूपप्रतिबंधक बंधारे नसल्याने समुद्राच्या उधाणामुळे लाटांचा मारा बसून बेटाचा भाग खचून पाण्याखाली जात आहे. गावातील अनेक घरांचीही पडझड होऊ लागली आहे.
विरारच्या पश्चिमेला समुद्रात असलेल्या बेटावरील अर्नाळा गावची लोकसंख्या पाच हजारांहून अधिक आहे. ऐतिहासिक अर्नाळा किल्ला असल्याने येथे नेहमीच पर्यटकांचा ओघ असतो, मात्र लवकरच हे बेट पाण्याखाली जाईल, अशी भीती ग्रामस्थांना वाटू लागली आहे. बेटावरील गावांचे संरक्षण व्हावे यासाठी धूप प्रतिबंधात्मक बंधारे बांधणे आवश्यक आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही मागणी आहे, मात्र धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम रखडले आहे. समुद्रातील पाण्याच्या लाटा गावातील किनाऱ्याला धडक देत असतात. त्यामुळे या पाण्याच्या लाटांमुळे आतापर्यंत या बेटाचा २०० फूटपेक्षा जास्त भाग पाण्याखाली गेला आहे. मुख्यत: पूर्व भागातील गावाचा भाग पाण्याखाली गेला आहे. अनेक झाडे उन्मळून पडली आहे, तर आजूबाजूच्या घराला भेगाही पडल्या आहेत.

गेल्या पावसाळ्यात येथे आलेल्या उधाणात ४ ते ५ घरे वाहून गेली होती. किनाऱ्याचा बहुतांश भाग ढासळला आहे. याबाबत प्रशासनाला अनेक वेळा तक्रारी तसेच दरवर्षी लेखी पाठपुरावा केला असून आश्वासनाशिवाय काहीच हाती लागले नाही. येत्या पावसाळ्यात मोठी भरती आल्यास हे बेट नष्ट होण्याची शक्यता आहे. दरवर्षी या बेटाचे कमी होणारे क्षेत्रफळ आता मोठी समस्या बनली आहे.
– चेतना मेहेर, सभापती, वसई पंचायत समिती

ग्रामस्थांना चिंता
या बेटावर येण्यासाठी बोट हेच एकमेव साधन आहे, परंतु बोटीसाठी अद्याप जेटी बांधलेली नाही. जेटी नसल्याने ग्रामस्थांना पाण्यात उतरून बोटीत बसावे लागते. ते अत्यंत धोकादायक आहे. वसईत आपत्कालीन यंत्रणा नाही. त्यामुळे जर याठिकाणी पावसाळ्यात एखादा प्रसंग उद्भवल्यास जीवितहानी होऊ शकते. वाहतुकीची चांगली व्यवस्था नसल्याने बचावकार्यही व्यवस्थित होऊ शकणार नाही. गावात अपुरा वीजपुरवठा, विस्कळीत वाहतूक व्यवस्था या समस्या पूर्वीपासूनच आहेत, परंतु आता बेटाचे क्षेत्रफळ कमी होऊ लागल्याने ग्रामस्थांना भविष्यातील मोठय़ा संकटाची चाहूल लागली आहे.