पुढील आठवडय़ात नव्याने निविदा; सद्य:स्थितीत बेटावरील गावात जीवघेणा प्रवास

लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई : अर्नाळा किल्लय़ात जाण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर जेट्टी बांधण्याचे काम मंजूर होऊन दोन वर्षे उलटली तरी अद्याप काम पुर्ण झालेले नाही. आता या कामासाठी पुढील आठवडय़ात नव्याने निविदा काढण्यात येणार आहेत.  काम अपूर्ण असल्याने बेटावरील ग्रामस्थांना तसेच पर्यटकांना सद्या गुडघाभर पाण्यात उतरून बोटीने जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

बेटावर असलेल्या ऐतिहासिक किल्लय़ावरून बेटाला अर्नाळा किल्ला गाव हे नाव पडले आहे. गावाचे क्षेत्रफळ ६७ हेक्टर असून लोकसंख्या साडेचार हजार आहे. या बेटावर १७३७ मध्ये जंजिरा किल्ला बांधण्यात आला होता. त्याची तटबंदी अष्टबुरूज असून  सुस्थितीत आहे. त्यामुळे पर्यटक किल्ला बघण्यासाठी बेटावरील गावात येत असतात. बेटावर सातवी पर्यंत शाळा आहे. २०१८-१९ मध्ये महाराष्ट्र सागरी मंडळाने जेट्टी बांधण्याच्या कामाला मंजुरी दिली होती. किनाऱ्यावरील जेट्टीसाठी साडेदहा कोटी तर गावातील जेट्टीसाठी साडेपाच कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते.

ाात्र मागील दोन वर्षांत हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. याबाबत अर्नाळा किल्ला ग्रामपंचायतीने मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री अस्लम शेख यांच्याकडे पुन्हा पाठपुरावा सुरू  आहे.  कामाला मंजुरी मिळण्यासाठी आम्हाला अनेक वर्ष संघर्ष करावा लागला होता, असे अर्नाळा किल्ला ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकात मेहेर यांनी सांगितले.

दरम्यान, किनाऱ्यावरील काम ७० टक्के झाले असून बेटावरील कामाच्या निविदा पुढील आठवडय़ात निघणार आहे.  निविदा मंजुरीनंतर एक वर्षांत काम पुर्ण होईल, असे महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

भरती, पावसाळ्यात धोका

बेटावरील गावातील विद्यार्थ्यांंना शिक्षणासाठी वसई तसेच मुंबईत जावे लागते.  गावातील मच्छिमार महिलांना मासेविक्रीसाठी तर नोकरदार वर्गाला दररोज कामानिमित्त जावे लागते. त्यांना बोट हा एकमेव पर्याय आहे. परंतु जेट्टी नसल्याने गुडघाभर पाण्यात उतरून बोटीतून ये-जा करावी लागते. पाण्यात उतरून विशेषत: भरतीच्या वेळी जाणे धोकादायक ठरते. पावसाळ्यात तर समुद्र खवळलेला असल्याने अशा प्रकारे समु्द्रात उतरणे जीवघेणे ठरते. त्यासाठी अर्नाळा किनाऱ्यावर आणि बेटावर जेट्टी बनविण्याची गेल्या अनेक वर्षांंपासूनची मागणी होती.