News Flash

गॅलऱ्यांचा फेरा : या कष्टाचं मोल काय?

अगदी समीक्षकांच्याच दृष्टीनं पाहिलं, तर पहिलेपणाच्या खुणा या प्रदर्शनातून दिसतात.

‘ओझ्याचं गाढव’ आणि गोधडी शिवणारी आई किंवा शिवणटिपण करणाऱ्या शेजारपाजारच्या बायका यांत फरक आहे, हे रंजिता कुमारीलाही माहीत होतं. पण पाटणा स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकताना आणि पुढे दिल्लीनजीकच्या ‘शिव नाडर (अभिमत) विद्यापीठा’त पदव्युत्तर शिक्षण घेताना ‘हा फरक खरंच असतो का?’ असा प्रश्न तिला पडत गेला. कष्टकऱ्यांच्याच वस्तीत वाढलेली रंजिता कुमारी ही वडील शिकलेले असल्यामुळे लहानपणापासून विचार करू लागली होती.. तो विचार अनेकदा ‘या कष्टाचं मोल काय?’ इथं येऊन थांबत असे, हेही कलाशिक्षण घेताना तिला अधिकच जाणवू लागलं. या जाणिवेला चित्ररूप कसं द्यायचं, हे पदवीशिक्षण पूर्ण झाल्यापासूनच रंजिता कुमारी ठरवू लागली. यापैकी पहिल्या काही वर्षांत साकार झालेली विविध चित्ररूपं आता मुंबईत रंजिता कुमारीच्या पहिल्याच एकल प्रदर्शनात पाहायला मिळत आहेत.

अगदी समीक्षकांच्याच दृष्टीनं पाहिलं, तर पहिलेपणाच्या खुणा या प्रदर्शनातून दिसतात. म्हणजे, अनेक तऱ्हांच्या दृश्यकलाकृती मांडताना, काही कलाकृती मूळ विषयापासून दूर गेलेल्या वाटतात. त्या कलाकृती चार-पाच वर्षांपूर्वीच्या आहेत. पण अलीकडच्या – गेल्या दोन वर्षांतल्या कलाकृतींमध्ये एक सुघटितपणा आहे. बाजरीच्या बियांचं विटेत रूपांतर होत जातंय, असं दाखवणारं आठ भागांतलं एक शिल्प इथं आहे, त्याचा संबंध डोक्यावर घेण्याची गवंडय़ांसारखी चुंबळ वापरून बनवलेले ‘टॉवर्स’ आणि त्याच्या आतून येणारे चुंबळधारी गवंडय़ांनी आपापल्या शेतजमिनींच्या आठवणी सांगितल्याचे आवाज असे घटक असलेल्या मांडणशिल्पाशी सहज जोडता येतो. गोधडी किंवा खास बिहारी पद्धतीची ‘सुजनी’ हे याच कष्टाचं स्त्रीरूप- स्त्री ही अतिशूद्रांपेक्षाही अतिशूद्र ठरत राहते, या विधानाचा थेट प्रत्यय देणारे बिनमोलाचे कष्ट घरोघरच्या स्त्रिया उपसताहेत, हे रंजितानंही पाहिलं होतं. सुजनीसाठी आता ‘मार्केट’ तयार होतं आहे, पण गोधडी शिवणाऱ्या स्त्रियांच्या श्रमाचं मोल मात्र त्यांना पुरेसं मिळत नाही, याची आठवण देणारी एक ‘सुजनी’ इथं प्रदर्शनात आहे. सुजनीच्या मागेच एक साडी आहे पांढरी. तिच्यावर डिझाइन असावं, तसे शिवणयंत्रांचे छाप आहेत. यंत्रांमध्ये शिवल्या जाणाऱ्या कपडय़ांपैकी काहींना रक्तासारखा लाल रंग आहे.

गाढव हे प्रतीकही भरपूर वेळा रंजितानं वापरलं आहे. गाढवाची अनेक चित्रं आहेत, पैकी सर्वात मोठं चित्र एका भिंतीवर आहे. पोती, दगडविटा, टायरपासून दुधाच्या चरव्यांपर्यंत कोणत्याही वस्तू असं गाढवाच्या पाठीवर लादलं जाणारं काही बाही कुठल्या ना कुठल्या चित्रात दिसतंच, ते सर्व या भिंतीवर एकत्र दिसू शकतं. या गाढवासमोरच डाळीची पोती भासतील असं मांडणशिल्प आहे, ते शेतकऱ्यांच्या श्रमांची आठवण देणारं आहे.

रीगल सिनेमाजवळ, ‘सहकारी भांडार उपाहारगृहा’च्या समोर ‘क्लार्क हाऊस’ नावाच्या इमारतीत हे प्रदर्शन भरलं आहे, ते २९ सप्टेंबपर्यंत रविवारीदेखील सुरू (सोमवारी बंद) राहील.

बैजू पार्थन.. पाहाच!

‘थ्रीडी पोस्टकार्ड’ वगैरेत वापरल्या जाणाऱ्या लेंटिक्युलर छपाईचं तंत्रज्ञान अतिशय सफाईदारपणे वापरून बैजू पार्थन यांची चित्रं तयार झाली आहेत. संगणक आणि ‘हस्तकौशल्य’ यांचं नवं संतुलन शोधणारे महत्त्वाचे चित्रकार, म्हणून बैजू पार्थन यांचा आवर्जून उल्लेख करायला हवा. या चित्रांची घडण कशी झाली, हेही चित्रांमधल्या प्रतीकांमधून ज्या आशयाची संगती आपापल्या मुक्तचिंतनांतून लावता येईल, त्या ‘अर्था’इतकंच महत्त्वाचं आहे!

प्रदर्शन आपल्या ‘जहांगीर आर्ट गॅलरी’तच आहे. चित्रकलेत रस असलेले आणि नसलेले या दोघांनीही पाहावं असं हे प्रदर्शन आजपासूनच सर्वासाठी खुलं होणार असून येत्या मंगळवापर्यंत सकाळी ११ ते सायं. ७ या वेळात ते पाहता येईल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2016 2:42 am

Web Title: art gallery exhibition at thane
Next Stories
1 ईशान्य सीमेवरील संवाद सेतूला मदतीची गरज
2 तरुणाईची ‘वायफाय’ स्थानके
3 नवउद्यमासाठी ग्राहकाभिमुखता हवी
Just Now!
X