शमिका वृषाली

मानवी मन हे उत्सवप्रिय आहे. ते आयुष्यात बहरणाऱ्या विविध रंगांचा आस्वाद कल्पकतेने व आनंदाने घेते. मानवी आयुष्यातील रंगछटा या केवळ हसऱ्या आहेत असे नाही. त्यात गर्द काळोख्या रंगांचाही समावेश होतो, तरीदेखील त्या छटा माणसाने तितक्याच आपुलकीने स्वीकारून त्यांना आपल्या जीवनशैलीत समाविष्ट केले आहे. म्हणूनच मृत्यूसारख्या प्रसंगाचाही सोहळा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग असतो; किंबहुना सर्वच सजीव सोहळे हे जन्म व मृत्यूच्या फेऱ्यांत भ्रमण करताना दिसतात. असे असले तरी या सगळ्यात सर्जनाचा सोहळा प्राधान्य पावतो. म्हणूनच या सर्जनाच्या गर्भिताशी असलेल्या मातृशक्तीला आदिम काळापासून पूजनीय मानले गेले आहे. या मातृशक्तीची रूपे अनेक आहेत. भारतीय संस्कृतीत आपली कूस सांडून या सृष्टीला जीवदान देणाऱ्या जगन्मातेपासून ते आपल्या पिल्लाला कुशीत घेऊन हिंडणाऱ्या सामान्य मातेलाही पूजनीय मानले जाते. तसेच अनेक अर्थाने एकमेकांमध्ये विरोधाभास असणाऱ्या वैदिक-तांत्रिक, सूर-असुर, शैव-वैष्णव यांच्या ठायीही या मातृशक्तीच्या प्रति एकनिष्ठता आढळते, असे नमूद केल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. ही शक्ती अनेक रूपांत आपल्याला दर्शन देते. तिच्या प्रत्येक रूपाच्या व्याख्या, भूमिका वेगळ्या असल्या तरी त्यांच्या स्थायी असणाऱ्या सर्जन क्षमतेचे दर्शन ती नेहमीच घडवत असते. तिच्या या नानाविध रूपांतील एक विशेष रूप म्हणजे उत्तानपाद स्वरूपातील तिचे अवतरण. या अवतारात उत्पत्तीचे केंद्रस्थान असलेल्या देवीच्या सर्जेन्द्रियाची उपासना केली जाते. या स्वरूपातील प्रतिमा भारतभरात अनेक ठिकाणी सापडल्या आहेत, त्यातील अनेक रूपांची आजही भक्तिभावे पूजा केली जाते. या रुपात ती कधी लज्जागौरी असते, तर कधी सांतेरी, तर कधी भारताच्या पूर्वेला असलेल्या आसामच्या भूमीत कामाख्या म्हणून आपले अस्तित्व दर्शवते.

Ozar, Air Force Chief,
ओझरस्थित देखभाल-दुरुस्ती केंद्राचा हवाई दल प्रमुखांकडून गौरव
BJP experiment, south Mumbai,
मते वाढविण्याचा भाजपचा प्रयोग
UPSC ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था केंद्रराज्य संबंध, घटनादुरुस्ती
Unauthorized constructions in Vasai Virar city
पालिका गुंतली निवडणुकीच्या कामात, भूमाफिया जोमात

आसाम या राज्याची गणना भारताच्या निसर्गसौंदर्याने नटलेल्या प्रदेशांमध्ये होते. जितके हे राज्य सुंदर तितकेच प्राचीन अशी या राज्याची ख्याती. आसाम या प्रांताची प्राचीनता सिद्ध करणारे अनेक पुरावे आज उपलब्ध आहेत. रामायण, महाभारत यांसारख्या महाकाव्यांमध्ये आसाम या प्रांताचा उल्लेख येतो. अहोम राजवंशाच्या स्थापनेनंतर हा प्रदेश आसाम म्हणून ओळखला जाऊ लागला. तत्पूर्वी वेगवेगळ्या साहित्यांत या भागासाठी अनेक नावे सापडतात. त्यात प्रामुख्याने प्रागज्योतिषपूर, कामरूप यांचा समावेश होतो. समुद्रगुप्ताच्या अलाहबाद प्रशस्तीमध्ये आसामचा कामरूप म्हणून उल्लेख आला आहे. आसाम हा प्रदेश निसर्ग, बिहूनृत्य याशिवाय प्रसिद्ध आहे तो कामाख्या देवीच्या स्थानामुळे. म्हणूनच या स्थानाचा उल्लेख ‘कामरूपाकामाख्या मंदिर’ असाही केला जातो, कामाख्या देवीचे देऊळ हे गुवाहाटीजवळ नीलाचल पर्वतरांगांमध्ये आहे. या मंदिरात देवीची मूर्ती नाही तर योनीरूपात तिची उपासना केली जाते. हे मंदिर जागृत शक्तिपीठ म्हणून भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे.

कामाख्या देवळाच्या स्थापनेविषयी अनेक रोचक कथा उपलब्ध आहेत. धार्मिक साहित्यात हे देऊळ कामदेवाने विश्वकम्र्याच्या मदतीने बांधले असा संदर्भ सापडतो. सतीच्या आत्मदहनानंतर समाधिस्थित असलेल्या शिवाची समाधी भंग करण्यासाठी कामदेवाने मदनबाण चालवला.. परिणामत: समाधीभंग पावलेल्या शिवशंकराने आपल्या क्रोधाग्नीने कामदेवाला भस्म केले, तर नीलाचल पर्वतावर शक्तीच्या कृपेने कामदेवाला पुन्हा जीवनदान मिळाले म्हणून कामदेवाने येथे शक्तीसह शिवाची उपासना करून देऊळ बांधले अशी आख्यायिका आहे, म्हणून या क्षेत्राला कामरूप असेही म्हटले जाते.

मुख्यत: हे स्थान तंत्रविद्येचे व सिद्धींचे माहेरघर मानले जाते. त्यामुळे या स्थळाची माहिती करून घेण्यासाठी ‘कालिका पुराण’,‘योगिनी तंत्र’,’ हेवाज्र तंत्र’, ‘देवी पुराण’, ‘देवी भागवत’ व ‘कुब्जिका तंत्र’ यांसारख्या ग्रंथांची मदत घ्यावी लागते. मूलत: हे देऊळ कधी बांधले गेले याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. १५ व्या शतकाच्या अखेरीस मुस्लीम आक्रमणात हे मंदिर उद्ध्वस्त झाले होते व १६६५ मध्ये कच्छ/कोच्छ वंशाच्या नरनारायण राजाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला, परंतु त्या वेळी मंदिराची पुनर्बाधणी ही मध्ययुगीन स्थापत्यशैलीप्रमाणे करण्यात आली. त्यामुळे मूळ मंदिराच्या स्थापत्यरचनेविषयी निश्चित असा बोध होत नाही. कामाख्या देवीची योनीरूप प्रतिमा ही मंदिराच्या आत एका गुहेमध्ये आहे व ज्या ठिकाणी ही प्रतिमा कोरलेली आहे तेथे अखंड पाण्याचा नैसर्गिक झरा पाझरतो, तर सध्याच्या मंदिराचा आकार हा चापाकार असून मंदिराच्या भिंतींवर चौसष्ट योगिनींची व अठरा भैरवांची शिल्पे आहेत. मंदिराच्या आवारात दशमहाविद्यांची (काली, तारा, षोडशी, भुवनेश्वरी, भैरवी, छिन्नमस्ता, धुम्रवती, बगलामुखी, मातंगी, कालामिका) व शिव अंशात्मक अवतारांची मंदिरे आहेत.

कामाख्या हे तांत्रिक सिद्धीचे सर्वोच्च सिद्ध शक्तिपीठ आहे. कालिका पुराणात या शक्ती पीठाच्या स्थापनेविषयी एक रोचक कथा देण्यात आली आहे, या कथेनुसार दक्षाच्या यज्ञात सतीने आत्मदहन केल्यानंतर, तिच्या विरहात व्याकूळ झालेल्या शिवाने उद्विग्न अवस्थेत तिचा निष्प्राण देह हातात घेऊन भ्रमण करायला सुरुवात केली होती, त्या वेळी भगवान शिवाला या मन:स्थितीतून बाहेर काढण्यासाठी विष्णूने सुदर्शनचक्राने सतीचे शरीर भग्न केले होते, त्या भग्न झालेल्या तिच्या शरीराचे भाग पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी पडले, त्यात तिच्या योनीचा भाग हा आसाम या प्रदेशात पडला, तेव्हापासून हा प्रदेश शक्तिपीठ म्हणून ओळखला जाऊ लागला. ज्या वेळी तिच्या योनीचा भाग या प्रदेशात ज्या पर्वतावर पडला त्या वेळी तो पर्वत निळ्या रंगात परिवर्तित झाला, म्हणून या पर्वताला नीलाचल पर्वत म्हणून ओळखले जाऊ लागले. या आख्यायिकेनुसार नीलाचल पर्वताला शिवाचेच रूप मानले जाते.

याशिवाय आणखीही एक पौराणिक कथा या शक्तिपीठाचा उगम नमूद करते. विश्वनिर्मितीच्या प्रक्रियेनंतर ब्रह्मदेवाला आपल्या कर्तृत्वाचा अहंकार झाला होता, तो अहंकार नष्ट करण्यासाठी कालीने आपल्या अंशापासून ‘केशी’नामक असुराची निर्मिती केली. या असुराच्या भीतीने ब्रह्मदेव विष्णुलोकात जाऊन लपले. ब्रह्मदेव हाती येत नसल्यामुळे केशीने ब्रह्मदेवांनी निर्माण केलेल्या तीनही लोकांना नष्ट करण्यास आरंभ केला. शेवटी ब्रह्मदेवांनी भगवान विष्णूंच्या मार्गदर्शनाखाली कालीची उपासना करून तिला प्रसन्न करून घेतले  व आपली चूक मान्य करून क्षमायाचना केली. ब्रह्मदेवाने जिथे देवीची उपासना केली त्या ठिकाणी देवी प्रकट झाली व ते शक्तिस्थान पुढे कामाख्या म्हणून प्रसिद्ध पावले. याशिवाय कामाख्या शक्तिस्थळाचा नरकासुर वधाशी खूप जवळचा संबंध आहे. या आख्यायिकेनुसार अहंकारी नरकासुर, देवीला आपली भार्या करू इच्छित होता. देवीने एका रात्रीत तू नीलाचल पर्वताच्या चारही बाजूंना दगडाचे चार रस्ते व मंदिराबरोबरच एक विश्रामगृह तयार केलेस तर मी तुझी पत्नी होईन, अशी अट घातली. त्याप्रमाणे नरकासुराने एका रात्रीत रस्ते तयार करून विश्रामगृह बांधायला सुरुवात केली, परंतु त्याचे हे काम पूर्ण होण्यापूर्वीच देवीने योजलेला मायावी कोंबडा आरवला म्हणून रागावलेल्या नरकासुराने त्या कोंबडय़ाला ठार मारले. एकुणात, नरकासुर आपले ईप्सिप्त साधू शकला नाही, कामाख्या देवीने रचलेल्या मायेत तो गुरफटला व त्याचा देवीने  श्रीकृष्णाकडून वध करून घेतला. अशा अनेक कथा- दंतकथा या स्थळाच्या उत्पत्तीशी जोडल्या गेल्या आहेत.

अनेक आख्यायिका- पौराणिक  कथा असल्या तरी मानववंशशास्त्रज्ञांच्या मतानुसार कामाख्या देवीची स्थापना ही तेथील स्थानिक गारो व खासी या आदिवासी जमातींनी केली. या समाजांमध्ये आजही मातृसत्ताक समाजरचना अस्तित्वात आहे. पती हा विवाहानंतर आपल्या सासरी राहतो. त्याच्या विवाहापूर्वीच्या कमाईवर मातेचा, तर विवाहानंतरच्या कमाईवर पत्नीचा अधिकार असतो, तर संततीवर वडिलांचा कोणताही अधिकार नसतो. धार्मिक संकल्पनांमध्ये महाकाली व महादेव यांची उपासना या समाजांमध्ये आढळून येते. किंबहुना आजही कामाख्या देवीला पशुबळी देण्याची प्रथा खासी समाजात दिसून येते.

कामाख्या हे स्थळ कौमारी शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध आहे. दर वर्षी या ठिकाणी अंबुवाची पर्व साजरे केले जाते. दरवर्षी देवी तीन दिवसांसाठी रजस्वला होते असे मानले जाते. या काळात योनीतून सलग तीन दिवस जलप्रवाहाच्या जागी रक्त प्रवाहित होते अशी समजूत आहे. प्रतिवर्षी आषाढ शुक्ल षष्ठी किंवा सप्तमीपासून एकादशीपर्यंत हा काळ येतो. या काळात मंदिराच्या गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. ज्या खडकावर देवीची योनिमुद्रा कोरलेली आहे त्या ठिकाणी या तीन दिवसांत सफेद कपडा अंथरला जातो. तीन दिवसांनंतर देवीची विशेष पूजा आणि साधना केली जाते व हा काळ अंबुवाची पर्व म्हणून साजरा केला जातो. तीन दिवसांनी त्या रजोवस्त्राचे वाटप भक्तांमध्ये प्रसाद म्हणून केले जाते. या पर्वाच्या निमित्ताने जगभरातील तांत्रिक, मांत्रिक, उपासक मंत्रसाधना व सिद्धी प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी एकत्र येतात. या मंदिरात सगळ्या जाती-वर्णाच्या स्त्रियांना प्रवेश दिला जातो, प्रवेश नाकारणाऱ्या व्यक्तीची सिद्धी नष्ट होते असे मानले जाते; किंबहुना या शक्तिपीठाच्या परिसरातील सर्वच महिला-कुमारिकांना देवीचे स्वरूप मानले जाते व त्यांचा अपमान हा देवीचा अपमान समजला जातो.

देवीच्या सर्जेन्द्रियांची उपासना ही प्राचीन परंपरा आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. भूमातेला या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीचे भरणपोषण करण्याचे दायित्व तिच्या खांद्यावर असते. तिच्या उदरात खेळणाऱ्या-वावरणाऱ्या सर्व प्राणिमात्रांची ती सक्षम अनंत काळाची माता आहे. म्हणूनच लोकसंस्कृतीचे विख्यात अभ्यासक रा. चिं. ढेरे यांनी नमूद केल्याप्रमाणे ‘पृथ्वीच्या सुफालानाची प्रक्रिया वर्णिताना तिच्यावर स्त्रीचे देहधर्म आरोपिले जातात; किंबहुना तिची मूर्ती ही स्त्री रूपात घडवून तिची उपासना केली जाते.’ म्हणूनच सर्जनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या योनिपूजेला शक्तिस्रोत ठरविण्यात आले आहे व रजस्वला देवीची उपासना सर्जनाची प्रक्रिया स्पष्ट करणारी ठरली. कामाख्या शक्तिपीठात साजरा होणारा अंबुवाची पर्व हे त्याच आदिशक्तीच्या सर्जनाची प्रचीती देणारे आहे . अंबु म्हणजे जल, वाची म्हणजे उमलणे, सुफलने. जलाच्या प्रवाहामुळे सुफलन होण्याच्या प्रक्रियेला अंबुवाची म्हटले जाते. भूमीला होणारी गर्भधारणा ही अंबुवाची (प्रारंभिक पर्जन्यवृष्टीनंतर) नंतरच होते. पावसाळी सरींनी तृप्त झालेल्या धरणीच्या गर्भात बीजाचा नवीन अंकुर उमलतो, तत्पूर्वीच्या या ओलावलेल्या धरणीचे रूप रजस्वला रूपात स्वीकारून, त्या काळात दौ (नांगर) संग व बीजवपन निषिद्ध मानले जाते, किंबहुना भूमीच्या रजस्वला रूपाचे वर्णन ‘कृषीपराशर’ या ग्रंथातही सापडते. आसाममध्ये काही ठिकाणी हे पर्व ‘अमती’, तर काही ठिकाणी ‘सत्त’ म्हणजे सात म्हणून प्रसिद्ध आहे. अमती या शब्दप्रयोगाचा उद्देश नक्की स्पष्ट नाही. आसाम, बंगाल, बिहार या प्रांतांत या काळात आंब्याचे उत्पन्न मोठय़ा प्रमाणात येते म्हणून कामाख्या देवीला आंबा, आंब्याच्या पानांचे हार अर्पण केले जातात म्हणून कदाचित हे पर्व ‘अमती’ किंवा ‘आमती’ म्हणून प्रसिद्ध असावे असे मानले जाते. याशिवाय विशेष नमूद करण्याची गोष्ट म्हणजे आंब्याच्या झाडाचा व फळाचा मातृपूजेशी असलेला संबंध हा प्राचीन आहे. अंबुपर्वाची सुरुवात आषाढातील शुक्ल सप्तमीला होता असल्यामुळे कदाचित या पर्वाला सात पर्व असे म्हटले जात असावे; परंतु सात या शब्दाचाही सप्तमातृकांमुळे मातृपूजेशी असलेला संबंध तितकाच रोचक आहे. असे असले तरी कामाख्या ही तिच्या सामान्य उपासकांसाठी माता, मातृशक्तीच आहे. शक्ती म्हणजे सामर्थ्य, पराक्रम. ती सदैव क्रियाशील असते. उत्पत्ती, स्थिती, लय हे तिचे गुणधर्म. तिचा संचार हा प्रत्येक प्राणिमात्रात असतो. तिच्याशिवाय सगळेच जग निर्जीव आहे. त्यामुळेच मनुष्यप्राण्याचा तिच्या रूपाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकारी असला तरी  ही जननी तिच्या साधकांसाठी आपली कूस उजवून सदैव त्यांचे भरणपोषण करत राहते.

(छायाचित्र सौजन्य : विकिपीडिया – कुणाल दलुई, शुभाशिष पाणिग्रही)

सौजन्य : लोकप्रभा