10 April 2020

News Flash

पोशाख व खाद्यसंस्कृती

आगरी माणसे पावसाळ्याच्या आधी आगोठीचे सामान भरून ठेवतात.

वसईचे : समाजरंग :प्रकाश पाटील

pprakashvasai@gmail.com

आगरी समाज : – पोशाख

आगरी समाजातील पुरुषांचा पारंपरिक पोशाख सुरका वा उभ्या पट्टय़ांची डिझाइन असलेली पातळ विजार/ लेंगा वा सफेद लेंगा वा खाकी हाफ पॅण्ट आणि गंजी फ्रॉक (बंडी) वा आतल्या बाजूस खिसा असलेला सदरा असा पोशाख घरात आणि काम करताना असतो. समारंभात धोतर आणि सदरा, त्यावर जाकीट आणि टोपी असा पेहराव असे. आता नवीन युवा पिढी मात्र जीन्स, ट्राउजर, टी शर्ट, सूट, ब्लेझर असा पेहराव करताना दिसते. विशेषत: सफेद शर्ट आणि लांब फॅशनेबल सदरा, शेरवानी धोती-कुर्ता याची ओढ तरुणाईत दिसते. आगरी महिला नऊवारी उभे लुगडे आणि वृद्ध महिला आडवे नऊवारी लुगडे आणि त्यावर चोळी नेसायच्या. मुली कट (स्कर्ट)-पोलके वा परकर-पोलके वा फ्रॉक घालत असत. आता मात्र आगरी समाजातील स्त्रिया नवीन पॅटर्नची साडी, ब्लाऊज आणि लग्नप्रसंगी काठ-पदराच्या साडय़ा वा पैठणी, तत्सम शालू तर मुली चुडीदार सूट, सलवारकुर्ता, अनारकली, प्लाझोपँट्स-कुर्ता, जीन्स, टी-शर्ट, पाश्चिमात्य पद्धतीचा गाऊन असा फॅशनबेल वेश परिधान करण्यात अग्रेसर आहेत. आगरी महिला घरात सोन्याचे मणी आणि काळ्या मण्यांची बारीक ‘गलसरी’ (मंगळसूत्र), काळी गाठी घालतात. त्यांच्या पायांच्या बोटात चांदीचे फेरवे वा जोडवे, चांदीच्या मासोळ्या असतात. पायात चांदीचे तोडे (पैंजण) असतात. लग्न समारंभात आगरी महिला साधारण २ ते २५ तोळ्यांचे मंगळसूत्र, पाच ते १५ तोळ्यांचा हार गळ्यात घालतात तर जुन्या महिला गळ्यात सोन्याची बोरमाळ घालतात. त्याचप्रमाणे हातात सोन्याच्या पातळ्या (बांगडय़ा) वा गोखरं (बांगडय़ांचाच एक प्रकार), नाकात सोन्यात मढवलेली मोत्याची नथ, मोती घालतात आणि अंबाडय़ात सोन्याचे ‘चंदक’ (फिरकी फूल) घालतात.

मुलांच्या कमरेला काळा करगोटा तर असतोच, पण लहान खासकरून मुलांच्या कमरेला चांदीचा करगोटाही असतो आणि पायात तांब्याच्या धातूचे वाळे (कडे) आणि हातात तांब्याचे, तांब्यात काळे मणी ओवलेले कडे असतात. लग्न समारंभात मुलांच्या गळ्यात सोन्याची चैन तर मुलींच्या कानात सोन्याचे दागिने आणि गळ्यात सोन्याची साखळी, सोन्याचा छोटा हार असतो. आगरी पुरुषही सोन्याच्या बाबतीत शौकीन आहेत. त्याच्या गळ्यात सोन्याची चैन, हातात सोन्याच्या अंगठय़ा, स्थिती चांगली असेल तर मोठे पेंडंट असलेल्या सोन्याच्या जाडजूड दोन-तीन साखळ्या आणि हातात सोन्याचे कडे (ब्रेसलेट) असते; परंतु हे सगळ्याच आगरी लोकांना आवडते असेही नाही. काही लोक कमीत कमी दागिने वापरणे पसंत करतात.

खाद्यसंस्कृती

आगरी समाजातील माणसे दुकानातला तयार मसाला वापरत नाहीत. ते अजूनही मिरच्या व इतर मसाल्याचे सामान घेऊन गिरणीत जाऊन मसाला कुटतात. आगरी माणसाला तिखट, तेलकट, झणझणीत आणि चमचमीत खायची सवय आहे.  आगरी समाजात रोजच्या जेवणात तांदळाची भाकरी किंवा वते (डोशासारखी पातळ पण थोडीशी चिवट रोटी), डाळ-भात, मासे, सुके म्हावरे (सुकट, जवला, मांदेली, वाकटय़ा किंवा खारं) असते. सुक्या बोंबलाची, जवल्याची किंवा सुकटीचा वांगे-बटाटा घालून थिबथिबीत रस्सा बनवतात. कधी सुके बोंबील तळले तर सोबत चिंचेचा कोळ व कोळीम घालून ‘चीचवनी’ बनवतात. कोळंबी रस्सा, वावीचा रस्सा बनविताना त्यात वांगे-बटाटे किंवा ‘शेगटाच्या’ (शेवग्याच्या) शेंगा टाकतात. खाडीत, मिठागरात मिळणारे काळे मासे, बोय, निवटय़ा, खाजरी आणि कोळंबी हे मासे नेहमीच्या जेवणात असतात. सुकं खोबरं, जिरं घालून चिंबोरी आणि शिंप्याचा रस्सा (ज्याला मालवणी लोक तिसऱ्या मसाला म्हणतात) आगरी लोक लज्जतदार बनवतात. मटणाबरोबरच बकऱ्याची मुंडी, पाय, वजडी आगरी माणसाला खूप आवडते. गावठी कोंबडा हा तर एक खास बेत असतो. थंडीत किंवा आजारी माणसाला तलंग (छोटी कोंबडी) आणून तिचे सूप तयार करून देतात. बकऱ्याच्या पायाचे सूप बनवले जाते. आज आगरी माणसाच्या घरात जरी गॅस आलेला असला तरी त्याचा घरात चूल ही असतेच. अजूनही त्याला चुलीवर ‘भुजलेले’ (भाजलेले) बोंबील-पापड आवडतात.

सणाच्या दिवशी मटण रश्शासोबत पुरी, वडे बनवले जातात. करंजी, गोडधान, खीर, पापडय़ा, पुरणाची पोळी, रवा (शिरा), पिठीचे लाडू, रव्याचे लाडू असे  पदार्थ बनवले जातात. घरी पाहुणे आल्यावर गरमागरम शिरा बनवून आग्रहाने वाढतात.

आगरी माणसे पावसाळ्याच्या आधी आगोठीचे सामान भरून ठेवतात. त्यात सुकं म्हावरं, घरीच तयार केलेले उडदाचे पापड, खारवडय़ा (तळून खाण्यासाठी साबुदाणा, तांदळाच्या पापडय़ा, शेवया आणि चकल्या), कैरीचे लोणचे, मिठाच्या पाण्यात बरणीत भरलेला आंबा (कैरी), मिठात खारवलेला कोलीम, कोलमाचं झणझणीत लोणचं अशा वस्तू तो पावसाळ्यासाठी भरून ठेवतो.

पावसाच्या सुरुवातीच्या दिवसांत डोंगरात उगवणारी ‘शेवलां’ची भाजी खाल्ल्याशिवाय आगरी लोकांचा पावसाळा सुरू होत नाही. त्यात थोडासा खारवलेला कोलीम टाकला जातो, त्यामुळे ती फार रुचकर होते. सुरुवातीच्या पावसात येणारी वल्गन ‘चिमणी’ पकडून घरी आणण्यात त्यांना मोठा आनंद होतो. त्यात ‘गाबोलीची चिमणी’ भेटली तर तो आनंद द्विगुणित होतो. त्याचप्रमाणे पावसाळ्यानंतर वास्तं (बांबूला पावसात फुटणारे कोंब) आगरी लोक वालाच्या भाजीत किंवा कोळंबीत घालून खातात. ते पावसाळ्यातल्या वापरासाठी खारवूनही ठेवतात. शेताच्या बांधावर उगवणारा ‘कविला’ (चिंचेच्या पाल्यासारखा दिसणारा ‘कवळा कवळा’ पाला), करडू तसेच याच सुमारास मिळणारी रानातली कंटोळेह यांच्या भाज्याही ते न चुकता खातात. अशी ही झणझणीत आणि रुचकर खाद्यसंस्कृती आगरी माणूस कुठेही असला तरी अजूनही जपून आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2020 12:02 am

Web Title: article vasai smajrang agri society akp 94
Next Stories
1 पाणी, बसप्रवास महागणार!
2 ठाणे पोलीस दलात अंतर्गत बदल्या
3 अभिनेत्री विदिशा म्हसकर हिच्याशी गप्पांची संधी
Just Now!
X