वसईचे समाजरंग : विशाखा कुलकर्णी

कुठल्याही समाजाने आपल्या प्रथा व परंपरा जोपासण्याबरोबर महत्त्वाचे असते ते म्हणजे आपल्या समाजाला एकत्रित बांधून ठेवणे, काळाप्रमाणे बदल घडवत समाजाचा एकोपा कायम ठेवल्यास समाजाची प्रगती होते,सामवेदी समाजाने देखील वसईच्या संस्कृतीत असेच महत्वाचे योगदान दिले आहे.

कलेचा वारसा जतन आणि संवर्धन केलेला वसईतील सामवेदी समाज आपल्या परंपरांना आजही धरून आहे. जगाच्या पाठीवर कुठेही जाणाऱ्या सामवेदी समाजातील माणसाला कायमच वासाईतल्या मातीची ओढ खुणावत असते, त्यामुळे वसई सोडून इतर कोणत्या जागी कायमचे स्थायिक होण्यासाठी सामवेदी समाजातील कुणी अगदी नाखूषच असते.

काळ बदलला तसे वसईतील प्रथा परंपरांना वेगवेगळे वळण मिळत गेले, प्रथेसोबत सोयीचाही विचार अधिक होऊ लागला. अगदी सामवेदी समाजातील पारंपरिक घरांची शैलीही बदलून त्यांची जागा बंगल्यानी घेतली. पारंपरिक घरे दुर्मिळ झाली असून घरात अत्याधुनिक सुखसोयी आल्या, पण त्यासोबत काही अंशी परंपरिकतेचा हात धरल्याचे दिसते. सामवेदी समाजातील वेशभूषा, दागदागिने बदलून त्यात आधुनिकतेचा संगम पाहायला मिळतो. सामवेदी समाजाचा मुख्य पारंपरिक व्यवसाय म्हणजे शेती, पण आता शेतीकडे वळणाऱ्या वर्गाची संख्या अगदी नाममात्र असून नोकरी-उद्योगाकडे सामवेदी समाजातील तरुण वर्ग वळताना दिसतो. माहिती तंत्रज्ञान,बांधकाम, हॉटेल क्षेत्र, आदरातिथ्य अशा क्षेत्रांत सामवेदी समाजातील तरुणाईचा अधिक ओढा दिसतो, अशी माहिती मनोज पाटील देतात.

ज्याप्रमाणे सामवेदी समाजातील समृद्ध परंपरांचा वारसा एका पिढीने दुसऱ्या पिढीला दिला. त्याच प्रमाणे समाजातील अनेक व्यक्तींनी समाजासाठी महत्त्वाचे कार्य केले आहे. अनेक संस्था समाजाच्या विकासासाठी कार्यरत आहेत. त्यातील एक महत्त्वाची संस्था म्हणजे संजीवनी परिवार, हेमंत नाईक हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. संजीवनी परिवार या संस्थेचे कार्यक्षेत्र मुख्यत्वे शिक्षण, पर्यावरण, आरोग्य, प्रबोधन असे आहे. या संस्थेने नुकताच रौप्यमहोत्सव पूर्ण केला, या कार्यकाळात संस्थेतर्फे अनेक उपक्रम आणि कार्यक्रम झाले, ज्याअंतर्गत शिक्षण क्षेत्रात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित केले गेले, ज्यामुळे या विद्यार्थ्यांना निश्चितच मदत झाली, याशिवाय स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शनही या संस्थेतर्फे करण्यात येते. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांचा  कौतुक सोहळा, केवळ अभ्यासाव्यतिरिक्त कलागुणांना वाव देण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा, विविध कार्यशाळा आयोजित केल्या जातात. संस्थेचे प्रबोधन क्षेत्रातील कार्य म्हणजे वसईतील प्रसिद्ध व्याख्यानमाला, अर्थात संजीवनी व्याख्यानमाला, सत्र गेल्या वर्षांपासून या व्याख्यान मालेत विविध नामवंत वक्त्यांचे व्याख्यान आयोजित केले जाते.

राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय पातळीवरील मातब्बर व्याख्यात्यांची उपस्थिती या  व्याख्यानमालेअंतर्गत  झाली आहे.  विषयांची विविधता आणि तरुणाईची उपस्थिती ही या व्याख्यानमालेची वैशिष्टे आहेत.या व्यतिरिक्त वेगवेगळे परिसंवाद, पालकमेळावा, पुस्तकभेटी असेही कार्यक्रम संस्थेतर्फे आयोजित केले जातात.

वसईतील पर्यावरण क्षेत्रातही या संस्थेचे योगदान महत्त्वाचे आहे. संस्थेच्या वतीने ‘संजीवनी वनराई’ हा उपक्रम करण्यात आला . ज्यात वृक्षारोपण करून त्या वृक्षांचे संवर्धनही करण्यात आले. या वृक्षाचा जुलै महिन्यात वाढदिवसदेखील साजरा करण्यात येतो,ज्याला वेगवेगळे मान्यवर येऊन वृक्ष जोपासनेचा संदेश दिला जातो. याच संस्थेच्या वतीने स्वच्छता अभियान राबवले जाते, ज्या अंतर्गत मंदिरे, वेगवेगळे समुद्रकिनारे अशा ठिकाणांची स्वच्छता तरुणीच्या मदतीने करण्यात येते. आरोग्य क्षेत्रातही या संस्थेचे महत्त्वाचे कार्य असून गरजू रुग्णांना अर्थसहाय्य देणे, समाजातील कर्करोगाचा वाढता धोका लक्षात घेऊन तपासणी शिबिरे आयोजित केली जातात, ज्याचा लाभ महिलांना घेता येऊ  शकतो, अशी माहिती संस्थेचे मार्गदर्शक कमलाकर पाटील सांगतात.

संजीवनी परिवारसोबत या समाजाची सामवेदी ब्राह्मण संघ ही आणखी एक संस्था आहे, जी समाजातर्फे वेगवेगळे उपक्रम राबवित असते. समाजाला आर्थिकदृष्टय़ा पाठबळ देणारी ‘जैमुनी पतपेढी’ ही आणखी एक महत्त्वपूर्ण संस्था आहे.

सामवेदी समाज हा पूर्वी पासूनच गायन, वादन, नाटक अशा कलांचा रसिक आहे, त्यामुळे समाजात विविध नाटय़ व गायन मंडळे आहेत. ‘अमर संगीत कला मंडळ’ ही संस्था संगीताचा प्रचार आणि प्रसार करणे, संगीत वर्ग घेणे, विविध नाटके सदर करणे असे कार्य कला क्षेत्रात करते. जवळपास ५० वर्षांपासून या संस्थेने संगीत क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे. संगीताचे कार्यक्रम, विशेषत: संगीत नाटकाला सामवेदी ब्राह्मण समाजातून मोठा प्रतिसाद मिळतो.

या व्यतिरिक्त सामवेदी समाजाच्या प्रत्येक गावात मंदिरे आहेत, जी मंदिरे केवळ देवस्थान नसून सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र आहेत. सामवेदी समाजात गावागावात भजनी मंडळे असत, आजही सन्मित्र युवा मंडळ (उमराळे), नवाळे भजनी मंडळ, उत्कर्ष भजनी मंडळ (मर्देस) अशी काही मंडळे सामवेदी समाजाची कलापरंपरा जोपासत आहेत.

समाजात साहित्य क्षेत्रात प्रा. नरेश नाईक, तसेच लेखिका ऋतुजा नाईक यांचा आवर्जून उल्लेख करता येईल, वसई-विरारमधील मुद्रा बुक डेपोचे मालक राजू नाईक याचाही वसईच्या साहित्यसंस्कृतीत मोलाचा वाटा आहे. विघ्नेश वझे हा समाजातील गायक विविध स्पर्धामधून नाव कमावत आहे, यासोबतच गायन क्षेत्रात सुभाष वझे, दत्ताबुवा वर्तक, सौरभ म्हात्रे यासारख्या व्यक्तींनी महत्त्वाचे योगदान दिले आहे.सामवेदी समाज वेगवेगळ्या गावात जरी वसलेला असला तरी त्यांच्यातील एकोपा आजही कायम आहे. हल्ली शहरात कुणी मृत्यू पावले तरी कुणालाही खबर नसण्याच्या या काळात सुखद किंवा दुख:द प्रसंगी समाजातील सर्वच जण एकत्र येतात. हा एकोपा आणि माणुसकी जपल्यामुळे सामवेदी ब्राह्मण समाज उत्तरोत्तर प्रगती करत आहे. vishu199822@gmail.com