लेझीम स्पर्धेत उत्कृष्ट संचलन करून येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिरच्या अरुणोदय शाळेने विविध पारितोषिके पटकावीत बाजी मारली आहे. शाळेच्या पटांगणावर पार पडलेल्या या स्पर्धेत शाळेला जास्त पारितोषिक मिळाल्याने येथील शिक्षकांसह विद्यार्थीवर्गात उत्साहाचे वातावरण आहे.
लोकसेवा समिती डोंबिवलीच्या वतीने स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय शाळेच्या पटांगणावर भव्य लेझीम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत कल्याण-डोंबिवली शहरातील विविध शाळांतील स्पर्धानी सहभाग घेतला होता. ५ वी ते ७ वी आणि ८ वी ते १० वी या दोन गटांत ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत ५ वी ते ७ वी या गटात प्रथम क्रमांक स्वामी विवेकानंद विद्यामंदिरच्या अरुणोदय या संस्थेने पटकाविला. दत्तनगर शाळेच्या माध्यमिक विभागाने द्वितीय तर याच शाळेच्या प्राथमिक विभागाने तृतीय क्रमांक पटकाविला.
राणाप्रताप व महात्मा गांधी विद्यामंदिर या शाळांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. उत्कृष्ट ध्वजधारी म्हणून दत्तनगर शाळा, उत्कृष्ट मानवंदना दिल्याबद्दल महात्मा गांधी विद्यामंदिर व उत्कृष्ट वेशभूषा म्हणून अरुणोदय शाळेला गौरविण्यात आले. ८ वी ते १० वी यात प्रथम क्रमांक अरुणोदय शाळा, द्वितीय क्रमांक महात्मा गांधी विद्यामंदिर तर तृतीय क्रमांक दत्तनगर शाळेला मिळाला.
या गटातील उत्कृष्ट ध्वजधारी म्हणून टिळकनगर शाळेला, उत्कृष्ट वाद्यवृंद म्हणून अरुणोदय शाळा, तसेच उत्कृष्ट वेशभूषेतही अरुणोदय शाळेनेच बाजी मारली.