हॅकर सीसीटीव्हीत कैद; फसवणूक झालेल्या ग्राहकांची संख्या ४८वर

वसईच्या एचडीएफसी बँक ग्राहकांची फसवणूक बँकेच्याच एटीएम केंद्रात स्कीमर उपकरण लावून झाल्याचे अखेर उघड झाले आहे. २० ऑक्टोबर २०१७ रोजी वसई पश्चिमेच्या बँकेच्या मुख्यालयातील एटीएम केंद्रात एका अनोळखी व्यक्तीने हे उपकरण लावल्याचे सीसीटीव्हीत आढळून आले आहे. दरम्यान, फसवणूक झालेल्या ग्राहकांची संख्या वाढत असून शुक्रवार दुपापर्यंत ४८ लोकांनी तक्रारी नोंदवल्या होत्या.

वसईतील एचडीएफसी बँकेच्या अनेक ग्राहकांच्या खात्यातून लाखो रुपये लंपास केल्याचे प्रकरण वसईत उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. हॅकरने गुरगावच्या मणेसर येथील एटीएम केंद्रातून हे पैसे काढले आहेत. त्यासाठी कार्डाचे क्लोनिंग करण्यात आले होते. ग्राहकांच्या कार्डाचे क्लोनिंग करण्यासाठी वसईतील एटीएम केंद्रात स्कीमर उपकरण लावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. २० ऑक्टोबर २०१७ रोजी एका अज्ञात व्यक्तीने बँकेच्या वसई पश्चिम येथील गुरुद्वाराजवळील मुख्यालयातील एटीएम केंद्रात स्कीमर उपकरण लावल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद दराडे यांनी दिली. बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक व्यक्ती टोपी घालून आणि तोंडाला रुमाल लावून एटीएम केंद्रात शिरल्याचे तसेच एटीएम यंत्रात फेरफार करत स्कीमरसारखे उपकरण लावत असल्याचे दिसून आले आहे, असे दराडे यांनी सांगितले. जवळपास चार महिन्यांनंतर हॅकरना कार्डाचे क्लोनिंग करण्यात यश आले आणि त्यांनी ग्राहकांच्या खात्यातून पैसे लंपास करण्यास सुरुवात केली, असे पोलिसांनी सांगितले.एटीएम केंद्रातील यंत्रात स्कीमर उपकरण नकळतपणे बसवले जाते. त्यानंतर जो ग्राहक एटीएम यंत्रात आपले कार्ड टाकतो त्याचा तपशील या स्कीमर उपकरणात नोंदवला जातो. अगदी पासवर्डदेखील उमटतो. त्यानंतर या तपशिलाच्या आधारे कार्डाचे क्लोनिंग केले जाते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांकडून एटीएम केंद्राची पाहणी

बुधवारी रात्रीपासून ग्राहकांच्या खात्यातून पैसे लंपास करण्यास  सुरुवात झाली. त्यानंतर गुरुवारी सकाळी ग्राहकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. गुरुवार दुपापर्यंत ३५ ग्राहकांनी तक्रारी नोंदवल्या होत्या. शुक्रवारी दुपापर्यंत हा आकडा ४८ वर गेला होता, तसेच अनेक ग्राहक फसवले गेल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात येतच होते. त्यामुळे हा आकडा ५०हून अधिक असून ११ लाखांपेक्षा अधिक रकमेचा अपहार झाल्याची नोंद माणिकपूर पोलिसांनी केली. शुक्रवारी पोलिसांनी बँकेच्या एटीएम केंद्राची पाहणी केली.

खातेदारांना पैसे मिळण्यास सुरुवात

एटीएम केंद्रातून बँक खातेदारांची पैसे लंपास होऊ लागल्यानंतर एचडीएफसी बँकेने ग्राहकांना पैसे देण्यास सुरुवात केली आहे. अनेक खातेदारांच्या खात्यात शुक्रवारी ही रक्कम जमा झाल्याने त्यानी सुटकेचा नि:श्वास टाकला. एटीएम केंद्रातून परस्पर पैसे लांबवले गेल्याने धास्तावलेल्या खातेदारांनी बँकेत धाव घेतली होती. बँकेनेही मग त्यांना ‘डिस्प्यूट फॉर्म’ भरण्यास देऊन पोलिसांमध्ये तक्रार करण्यास सांगितले होते. ज्या तक्रारदारांनी पोलीस ठाण्यात हा अर्ज देऊन त्याची नक्कल प्रत बँकेत जमा केली त्यांना बँकेने पैसे देण्यास सुरुवात केली आहे. अनेक खातेदारांना लंपास करण्यात आलेली सर्वच्या सर्व रक्कम परत मिळाली आहे. माझे ३० हजार रुपये काढून घेण्यात आले होते, परंतु शुक्रवारी बँकेत ३० हजार रुपये जमा झाल्याचा लघुसंदेश आल्याची माहिती एक तक्रारदार डॉनल्ड घोन्साल्विस यांनी दिली. माझ्यासोबत असलेल्या अनेक खातेदारांना ही रक्कम परत मिळत असल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, एटीएम केंद्रात स्क्रिमर लावून ते हॅक केल्याची माहिती मिळाल्यानंतर खातेदारांनी बँकेच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.