ठाणे खाडीकिनाऱ्यावरील मच्छीमार प्रतिनिधींचे निरीक्षण
शहरवासीयांचे दळणवळण सुरळीत होण्यासाठी खाडय़ा आणि नद्यांमध्ये भव्य पुलांची निर्मिती केली जात असून, त्यासाठी प्रवाहामध्ये मोठय़ा प्रमाणात भराव टाकला जातो. उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा भराव उचलण्याची आवश्यकता असते. मात्र बांधकाम करणारा ठेकेदार आणि संबंधित यंत्रणा हा भराव दूर करण्यासाठी कोणत्याही प्रकारची काळजी घेत नाहीत. त्यामुळे खाडी प्रवाहास अडथळा निर्माण झाला असून पाण्याचा प्रवाह थांबून गेला आहे, असे मत खाडीकिनाऱ्यावरील मच्छीमार आणि कोळी समाजातील प्रतिनिधींनी मांडले आहे.
कांदळवन कक्ष मुंबई, सीकॉन कोईम्बतूर आणि बांदोडकर विज्ञान महाविद्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यामाने ठाणे खाडीकिनाऱ्याच्या जैवविविधतेचा आणि येथील ‘फ्लेमिंगो अभयारण्य’चा अभ्यास केला जात आहे. या अभ्यासक्रमाअंतर्गत संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींनी ठाणे खाडीकिनारी राहणाऱ्या मच्छीमार समाज आणि कोळी बांधवांशी चर्चा करून त्यांचे खाडी संदर्भातील निरीक्षण मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यावेळी या मंडळींनी खाडीच्या अंतरंगातील आणि बाह्य़ पर्यावरणाची सविस्तर निरीक्षणे मांडली. खाडीकिनाऱ्यावरील पाणी प्रवाह रोखण्यामध्ये उड्डाणपुलाखाली टाकण्यात येणारा भराव कारणीभूत असून, नियमानुसार बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हा भराव काढून टाकण्याचा नियम आहे. मात्र त्यासाठी होणारा खर्च टाळण्यासाठी ठेकेदार हा भराव कायम ठेवतो. त्यामुळे प्रवाह अडून राहण्याबरोबरच अशा दगडी ढिगाऱ्यांना होडय़ा धडकून त्यांचे नुकसानही होत असते. खाडय़ांमध्ये प्रदूषित पाणी साठून राहून त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होण्यासही ही बाब कारणीभूत असल्याचे विटावा कोळीवाडय़ातील वसंत पाटील यांनी सांगितले. खाडीसमोर दुसरे संकट बाहेरून टाकण्यात येणारा घनकचरा, सांडपाणी आणि गाळाचे असून त्यामध्ये प्लास्टिक पिशव्या आणि थर्माकॉलचे प्रमाण मोठे आहे. प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे खाडीमध्ये गाळ निर्माण झाला असून, वर्षांनुवर्षे हा कायम राहतो.
यावेळी कांदळवन कक्षाच्या प्रकल्प समन्वयक मेघना दवेर, सीकॉमचे शिरीष मंन्ची, डॉ. गोल्डीन कॉडरेस, बांदोडकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रघुनंद रघुनंदन आठल्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
औद्योगीकरणामुळे फ्लेमिंगो ठाणे खाडीवर..
उरण आणि नवी मुंबई परिसरात आलेल्या औद्योगिक कंपन्यांमुळे तेथील प्रदूषणात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे तेथून फ्लेमिंगो मोठय़ा प्रमाणात ठाणे खाडीकिनाऱ्यावर दाखल होऊ लागले आहेत. येथील प्रदूषणही मोठे असले, तरी तेथील प्रदूषणाच्या तुलनेत कमी आहे. मात्र भविष्यात त्यात वाढ होऊ नये यासाठी येथील स्थानिकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत नंदकुमार पवार यांनी मांडले.

खाडी दक्षता आणि कृती समितीची शिफारस..
कांदळवन संरक्षणासाठी काम करणारे कांदळवन कक्ष, सीकॉन कोईम्बतूर आणि ठाण्यातील बांदोडकर महाविद्यालयाच्या वतीने आयोजित चर्चासत्रामध्ये कोळीबांधवांनी खाडीवरील संकटावर उपाय योजण्यासाठी खाडी दक्षता कृती समितीची आवश्यकता विशद केली.