सागर नरेकर

बदलापूरमध्ये ७० हजार नागरिकांना फटका; ७० कोटींपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज

२६ आणि २७ जुलै रोजी बदलापूर शहरात आलेल्या पुराचा फटका शहरातील जवळपास ७० हजार नागरिकांना बसल्याचा अंदाज आहे. तसेच अडीच हजार दुकाने, आस्थापने आणि नागरिकांच्या एकूण नुकसानीचा आकडा ७० कोटींपेक्षा अधिक असण्याचा प्राथमिक अंदाज नगरपालिका प्रशासनाने केलेल्या पाहाणीतून पुढे आला आहे. या पुरात आठ ते दहा हजार घरे पाण्याखाली गेली होती. पुराचे पाणी ओसरताच शहरात रोगराई पसरू नये यासाठी मोठय़ा प्रमाणावर मदतकार्य सुरू झाले असले तरी साफसफाईच्या कामात जागोजागी येणाऱ्या अडचणींमुळे नगरपालिका प्रशासनाच्या मर्यादाही यानिमित्ताने स्पष्ट झाल्या आहेत.

बदलापूर पश्चिमेतील रमेशवाडी, समर्थनगर, हेंद्रेपाडा, गणेश नगर, दुबे बाग, भारत कॉलेज परिसर, दीपाली पार्क, शनिनगर, सर्वोदय नगर या भागांतील सुमारे आठ ते दहा हजार घरांमध्ये पाणी शिरले होते, अशी माहिती कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाने दिली आहे, तर शहरातील सुमारे अडीच हजार दुकाने आणि आस्थापनांना या पुराचा मोठा फटका बसला आहे. शहरातील एकूण नुकसान पाहता ते ६० ते ७० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता खुद्द कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी व्यक्त केली आहे, तर शहरातील ७० हजार नागरिकांना या पुराचा फटका बसला असल्याचाही अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच नुकसानीचा आकडा पाहणीनंतर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुरात नुकसान झालेल्या मालमत्तांचा आणि नुकसानीचा पंचनामा करण्यास रविवारपासून अंबरनाथ महसूल कार्यालयाने सुरुवात केली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने अधिकारी पंचनामा करत असल्याचे तहसीलदार जयराज देशमुख यांनी सांगितले आहे.

पुराचे पाणी ओसरल्यानंतर नागरिकांनी घरात प्रवेश केला. अनेक भागांत अजूनही विद्युतपुरवठा सुरळीत झालेला नाही. पश्चिमेतील बॅरेज रस्ता, रमेशवाडी, समर्थ नगर या भागांत सलग तिसऱ्या दिवशी वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिक हतबल झाले आहेत. पाण्याची सुविधा असली तरी वीज नसल्याने पाणी घराघरांत पोहोचवणे अशक्य होऊ न बसले आहेत. पश्चिमेतील काही भागांत पुराची झळ बसलेली नसतानाही त्या भागात वीजपुरवठा तीन दिवसांपासून खंडित असल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. सलग चोवीस तास वीज मीटर, रोहित्र पाण्याखाली असल्याने महावितरणाला वीजपुरवठा सुरू करण्यात अडचणी येत आहेत. विजेअभावी घरातील स्वच्छता करण्यातही नागरिकांना अडचणी येत आहेत. अनेक घरांत पाण्यासह किडे, विंचू, गोम यांसारखे सरपटणारे प्राणीही शिरल्याने घरात राहणे धोक्याचे झाले आहे. लहान मुलांना घरात कसे ठेवावे असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. घरातला कचरा, भिजलेले धान्य, गाद्या, कपडे बाहेर टाकले जात आहेत. नगरपालिका प्रशासनाकडून कचरा वेळीच उचलला जात नसल्याने विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत.

पालिका प्रशासनाची मदत तोकडी

बदलापूर शहराची लोकसंख्या साडेतीन लाखांच्या घरात आहे. त्याच वेळी कुळगाव बदलापूर नगरपालिकेची यंत्रणा लहान असल्याने महापालिकेच्या क्षमतेच्या शहराला सुविधा पुरवण्यात पालिकेला मर्यादा येत असल्याचे समोर आले आहे. त्यातही अनेक ज्येष्ठ आणि दादा नगरसेवक आपल्या प्रभागात स्वच्छतेसाठी अति आग्रही असल्याने नवख्या नगरसेवकांची आणि पर्यायाने नागरिकांची कोंडी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे बहुतांश नगरसेवक पालिकेच्या मदतीवर अवलंबून न राहता स्वखर्चाने कचरा उचलण्याचे, पाणी आणि आरोग्य सेवा पुरवण्याचे काम करत आहेत.

कपडय़ांचा एकच जोड, ओली अंथरुणे

पुराचे पाणी घरभर शिरल्याने अनेक घरांतील प्रत्येक वस्तू भिजली आहे. गेल्या तीन दिवसांपासून अनेक कुटुंबे अंगावरच्या कपडय़ांनिशी वावरत असल्याचे दिसून आले. ओल्या अंथरुणातच मुलांना झोपावे लागत असल्याची तक्रार गणेश नगरच्या उमा निकेतन सोसायटीतल्या विनायक दापडे यांनी केली. शालेय साहित्याचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षणही संकटात सापडले आहे.

विजेचा लपंडाव

पुराच्या पाण्यामुळे बदलापूर पश्चिमेतील महावितरणाची संपूर्ण यंत्रणा कोलमडली आहे. शहरातील विविध भागांत चौथ्या दिवशीही वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. त्यात ज्या भागाला पुराचा फटका बसला नाही, त्या भागातही विजेचा लपंडाव सुरू आहे.

सध्या नागरिकांच्या आरोग्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मदतीने पालिकेच्या डॉक्टरांसह ८ डॉक्टर तीन पथकांत काम करत असून विविध प्रभागांत तपासणी सुरू आहे. हा पूर इतक्या मोठय़ा प्रमाणावर येईल याचा अंदाज नव्हता. मात्र पालिकेचे नदीच्या पाणी पातळीवर लक्ष होते. सध्या मदतकार्य सुरू असून कचरा उचलणे आणि दरुगधी कमी करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

– प्रकाश बोरसे, मुख्याधिकारी, कुळगाव बदलापूर नगरपालिका