जळगाव येथील गांधी रिसर्च फाउंडेशनच्या यंदाच्या गांधी संस्कार परीक्षेत बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाच्या सोहम बारी या विद्यार्थ्यांने राज्यातून सुवर्णपदक मिळवत प्रथम येण्याचा मान पटकावला. तो अकरावीत शिकत आहे. त्याचबरोबर पदवी महाविद्यालयात द्वितीय वर्षांत शिकणाऱ्या सुतार या विद्यार्थिनीने उच्च वयोगटात सुवर्णपदक पटकावत प्रथम येण्याचा मान मिळवला. आजच्या बदललेल्या मूल्यव्यवस्थेमध्ये महात्मा गांधीजींच्या विचारांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा, तसेच गांधीजींच्या विचारांशी वास्तव जीवनात अंमलबजावणी करावी, हा उद्देश गांधी संस्कार परीक्षेचा असतो. मागील सात वर्षांपासून गांधी संस्कार परीक्षेत बांदोडकर महाविद्यालय नेत्रदीपक कामगिरी करत आहे. गांधीविचार आणि गांधीवादाचा प्रचार-प्रसार करण्याचे हे एक सुलभ साधन आहे, असे मत यावेळी समन्वयक तसेच रसायनशास्त्राच्या वरिष्ठ प्राध्यापिका मंजिरी रानडे यांनी व्यक्त केले.