विशाखा कुलकर्णी vishu199822@gmail.com

वसईच्या जडणघडणीत अनेक समाजांनी योगदान दिले. त्यापैकी एक भंडारी समाज आहे. भंडारी समाजाने कला, नाटय़, सहकार, राजकारण, शिक्षण, व्यवसाय आदींमध्ये आपला ठसा उमटवला आहे. काळाच्या प्रवाहात नवीन धोरणे, पद्धतींचा स्वीकार करून हा समाज पुढे जात आहे. भंडारी समाजाने वसईत उभारलेले नाटय़गृह वसईतील एकमेव व्यावसायिक नाटय़गृह असून ते वसईची शान बनलेले आहे.

Innovative Polling Stations, Nagpur, Environment and Tribal Culture, nagpur lok sabha seat, polling station, slefie points, gadchiroli, nagpur polling station news,
मतदान केंद्रांवर जंगल, पर्यावरण, आदिवासी संस्कृतीचे दर्शन……
caste politics in uttarakhand
ब्राह्मण ते ठाकूर, दलित ते मुस्लिम; उत्तराखंडमध्ये जातीय समीकरणावरच निकालाचे गणित
Political divisiveness, campaign material,
राजकीय फूट प्रचार साहित्य निर्मात्यांच्या पथ्यावर, मागणीत वाढ झाल्याने कारागिरांची रात्रंदिवस मेहनत
43 percent Maratha women labour Report of the Backward Classes Commission
४३ टक्के मराठा महिला मजूर; मागासवर्ग आयोगाचा अहवाल; सरकारी नोकऱ्यांतील प्रतिनिधित्वही कमी

भारत हा देश विविधतेने नटलेला आहे, असे आपण म्हणतो, तेव्हा ही विविधता केवळ वेगवेगळ्या धर्मापुरती मर्यादित नसते. ही विविधता वेगवेगळ्या जाती, वेगवेगळे समाज आणि प्रदेशातही आढळून येते. एखाद्या समाजातील लोक कुठल्या कार्यक्रमाला, समारंभाला किंवा अगदी दिवसभरानंतर एकत्र येतात, गप्पा मारतात, आपल्या विचारांची देवाणघेवाण करतात, तेव्हा त्या लहानसहान गप्पातूनही त्यांच्या सामाजिक जीवनाची झलक दिसून येते. अशा छोटय़ा छोटय़ा गप्पांच्या मित्रमंडळातून हळूहळू त्या समाजाच्या माणसांना एका छताखाली आणणाऱ्या संस्था बनतात आणि त्या संस्थाच त्या सामाजिक चेहऱ्याचे प्रतिनिधित्व करत असतात. मग अशा संस्था वेगवेगळे कार्यक्रम, संमेलने आयोजित करतात, त्यानिमित्ताने समाजातील लोक एकत्र येतात. समाजातील ज्या लोकांनी मोठय़ा स्तरावर प्रगती केली आहे, वेगवेगळ्या कलागुणांमध्ये, खेळात नैपुण्य दाखवले आहे, अशा लोकांमुळेही समाजाची एक वेगळी ओळख बनत असते.

वसई-विरारमधील भंडारी समाजही अशा प्रकारे एकजुटीने नांदत आहे. या समाजातील विविधता वेगळी आणि वैशिष्टपूर्ण आहे. वसईच्या जडणघडणीत विविध समाजांनी योगदान दिलेले आहे. त्यात भंडारी समाज महत्त्वपूर्ण आहे. सामाजिक स्तरावर भंडारी समाजाचे योगदान मोठय़ा प्रमाणावर आहे. भंडारी समाजात सध्या ‘राऊत’, ‘ठाकूर’, ‘म्हात्रे’, ‘कडू’, ‘चुरी’, ‘पाटील’, ‘चौधरी’, ‘चोरघे’, ‘किणी’ ही आडनावे सामान्यपणे दिसून येतात.

कुठलाही समाज एकत्र असण्याचे लक्षण म्हणजे त्या समाजातील परस्पर संबंध निकोप असणे, समाजात कुठले वाद, भांडण-तंटे सामंजस्याने सोडवणे महत्त्वाचे आहे. याच दृष्टीने भंडारी समाजातील न्यायदानासाठी पूर्वी गोत मंडळे होती. गोत हा गोत्र या शब्दाचा अपभ्रंश आहे. गोत मंडळे समाजातील वेगवेगळ्या भांडणतंटे करणाऱ्या अथवा समाजविरोधी काम करणाऱ्या लोकांना न्यायानुसार शिक्षा देण्याचे काम करत असतात. यामागे उद्देश कदाचित आपल्या जातीतील झगडे-तंटे समाजाबाहेर न जाऊ  देता समाजातील लोकांनी सामंजस्याने सोडवावेत, असा असावा. आज मात्र ही पद्धत बंद झालेली दिसते. परंतु अलीकडेच साधारण १९९०मध्ये दिवंगत अनंतराव वा. ठाकूर यांनी ‘सामाजिक न्याय मंडळाची’ स्थापना केली. या न्यायमंडळांच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती वसईतील सर्व गावांमध्ये होती. या न्यायमंडळांमार्फत जातीतील भांडणेतंटे मिटवून, त्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला गेला. या मंडळामुळे छोटय़ा छोटय़ा कारणासाठी कोर्टाची पायरी चढावी न लागता तो प्रश्न सामंजस्याने सोडवता येणे शक्य झाले, असे समाजाचे नेते दिलीप राऊत यांनी सांगितले. अनंतराव ठाकूर यांच्या निधनानंतर मात्र या सामाजिक न्याय मंडळाचे काम स्थगित झाले. समाजात योग्य प्रकारे न्याय देण्याचा हा प्रयत्न अतिशय उल्लेखनीय होता.

सध्या भंडारी समाजात अनेक वेगवेगळ्या संस्था कार्यरत आहेत. त्यातील एक म्हणजे ‘शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाज विश्वस्त मंडळ.’  या संस्थेची स्थापना १ मार्च १९७४मध्ये झाली. भंडारी समाजामधून पाच वर्षांच्या कालावधीसाठी या मंडळाची कार्यकारिणी निवडली जाते. रीतसर निवडणूक होऊन यातील पदाधिकारी निवडले जातात. यात अध्यक्ष, तीन विभागवार उपाध्यक्ष, तीन सल्लागार, सचिव, सहसचिव आणि सदस्य असे या कार्यकारिणीचे स्वरूप असते. सध्या या संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. दिलीप म्हात्रे आहेत, तर विजय राऊत, चंद्रशेखर पाटील व राजेश राऊत हे उपाध्यक्ष आहेत. या संस्थेच्या उपसमित्याही आहेत. यात सांस्कृतिक समिती, शैक्षणिक समिती, महिला व बालकल्याण समिती, संस्थेच्या वेगवेगळ्या वास्तू व जागांच्या दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी एक वेगळी समिती आहे. त्या त्या विषयानुसार या समित्यांनी कार्यक्षेत्र वाटून घेतले आहे. या संस्थेत महिलांचा सहभागही तितकाच महत्त्वपूर्ण आहे. या संस्थेतर्फे आरोग्य शिबिरे, शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर, महिला सक्षमीकरणासाठी खाद्यमेळाव्यासारखे कार्यक्रम, तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा यांसारखे विविध कार्यक्रम वर्षभरात आयोजित केले जातात.

वसई सांस्कृतिक नगरी असली तरी वसईत एकही अद्ययावत नाटय़गृह नाही. शासन आणि पालिका स्तरावर नाटय़गृह बांधण्याच्या योजनांच्या घोषणा झाल्या. मात्र त्या कागदावरच राहिल्या. भंडारी समाजाने मात्र ही सांस्कृतिक गरज ओळखून वसईतील नाटय़प्रेमी, हौशी, रसिकांसाठी शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाज विश्वस्त मंडळ या संस्थेतर्फे एक नाटय़गृह बांधायचे ठरवले आणि आज वसईच्या पारनाका येथील अनंतराव ठाकूर नाटय़गृह नावाचे हे नाटय़गृह वसईची शान ठरले आहे. भंडारी समाजातर्फे बांधले गेलेले हे नाटय़गृह वसईतील रसिकांना छान छान नाटके वसईतच पाहायची संधी उपलब्ध करून देत आहे. अनंतराव ठाकूर नाटय़गृह या नावाने प्रसिद्ध असलेले हे नाटय़गृह वसईतील विविध सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमांचे हक्काचे स्थळ आहे. आधुनिक रचना, प्रशस्त जागा यांमुळे या नाटय़गृहात व्यावसायिक नाटकांचे, कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

याव्यतिरिक्त समाजाच्या शेषवंशीय क्षत्रिय शिक्षक उत्तेजक संघ, शेषवंशीय क्षत्रिय विद्यावर्धिनी समाज यांसारख्या इतरही संस्था समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. कला क्षेत्रात ‘मन्वंतर’ कला मंडळ ही संस्था कार्यरत आहे. गेल्या २७ वर्षांपासून ही संस्था वसईतील कला क्षेत्रात आपले योगदान देते आहे. नाटय़क्षेत्रात, विशेषत: संगीत नाटकांमध्ये ही संस्था खूप उत्तम कामगिरी करत आहे. राज्यभरातील विविध नाटय़स्पर्धामध्ये या संस्थेच्या नाटकांना सलग बक्षिसे मिळाली आहेत. या संस्थेतर्फे दरवर्षी नवनवीन व दर्जेदार नाटके पाहायला मिळतात.

वसईच्या सामाजिक क्षेत्राबरोबर क्रीडा, सहकार, शिक्षण आणि राजकारण या क्षेत्रात भंडारी समाजाने मोठे योगदान दिलेले आहे. भंडारी समाजाने वसईच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान आहे. पालिकेतील तसेच विविध पक्षांतील पदांवर भंडारी समाजातील नेते आहेत. क्रीडा क्षेत्रात भंडारी समाजातील तरुणांनी राष्ट्रीय स्तरावर कामगिरी केलेली आहे. विविध व्यवसायांतून भंडारी समाजाने रोजगारनिर्मिती केलेली आहे. समाजाबरोबर वसईच्या विकासात हातभार लावण्यासाठी भंडारी समाजाचे नेते प्रयत्नशील आहेत. तरुणांच्या नवदृष्टिकोनाची त्यांना जोड मिळत आहे. भविष्यात समाजासाठी भरीव काम करण्याचा त्यांचा मानस असून त्यादृष्टीने विविध योजना राबवून त्या पूर्णत्वास नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.