लोकसभेसाठी युती; मात्र स्थानिक पातळीवरील स्पर्धेमुळे कोंडी

सागर नरेकर, बदलापूर

खासदार कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्याविरोधात गेली चार वर्षे रणिशग फुंकणाऱ्या बदलापूर, मुरबाडमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची युतीमुळे कोंडी झाली आहे. काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या नगरपालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर भाजपला धडा शिकवण्याचे बेत आखत स्थानिक नेत्यांच्या गुप्त बैठका सुरू झाल्याचे समजते. तर लोकसभा निवडणुकीतील विजयात अडथळे येऊ नयेत यासाठी  खासदार कपिल पाटील यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांशी जवळीक साधण्याचे प्रयत्न चालवले असल्याची चर्चा आहे.

गेल्या पाच वर्षांत एकमेकांवर टीका करत स्वबळाची भाषा करणाऱ्या शिवसेना आणि भाजपने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर युती केली आहे. अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपरिषदेत आणि मुरबाड नगर पंचायतीत सध्या शिवसेना, भाजप हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात आहेत. अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेच्या मागील निवडणुकीत शिवसेनेने भाजपला धक्का देत एकहाती सत्ता स्थापन केली. बदलापूर, मुरबाड परिसराचे भाजपचे विद्यमान आमदार किसन कथोरे आणि शिवसेना नेत्यांमध्ये विस्तवही जात नाही. खासदार कपिल पाटील यांच्याविरोधातही शिवसेनेत नाराजी आहे.

आमदार कथोरे यांनीही कुळगाव बदलापूर नगरपालिकेतील शिवसेनेच्या कारभारावर नेहमीच आसूड ओढले आहेत. अंबरनाथ आणि मुरबाड पंचायत समिती निवडणुकीनंतर मुरबाडचे नगरसेवक आणि पदाधिकारी यांना भाजपमध्ये प्रवेश देत कथोरे यांनी मध्यंतरी शिवसेनेला धक्का दिला. त्याचवेळी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांनीही स्थानिक पातळीवर शिवसेनेला विरोध केला. त्यामुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघात कपिल पाटील आणि शिवसेनेतील संबंध कमालीचे ताणले गेले असून यावेळी पाटील यांना मदत करायची नाही यासाठी या भागातील शिवसेना नेत्यांच्या गुप्त बैठका सुरू झाल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे. यासंबंधी खासदार पाटील यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही होऊ शकला नाही. भाजपला मदत करण्याविषयी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली.

अंबरनाथमध्येही तीच परिस्थिती

अंबरनाथ पालिकेत शिवसेनेची स्थिती मजबूत आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत हा पक्ष स्वबळावर लढणार हे निश्चित आहे. या ठिकाणी शिवसेनेचे खासदार असल्याने भाजपची कोंडी होणार आहे. आता शिवसेनेसाठी प्रचार करायचा आणि काही महिन्यांत पुन्हा शिवसेनेविरोधात कसे जायचे, असा प्रश्न भाजप पदाधिकाऱ्यांना पडला आहे.

शिवसेना नेत्यांची कोंडी

लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या १० महिन्यांत कुळगाव बदलापूर पालिका आणि मुरबाड नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजप खासदारासाठी आणि १० महिन्यानंतर भाजपविरुद्ध प्रचार कसा करायचा अशा कोंडीत शिवसेनेचे नेते सापडले आहेत. त्यांचा एकंदर सूर पहाता खासदार कपिल पाटील यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिष्टाई करावी असेही प्रयत्न भाजपकडून सुरू झाल्याचे वृत्त आहे.