भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात सध्या भारतीय जनता पक्षाकडून सर्वत्र पक्षाची जाहिरात करणारी फलकबाजी सुरु करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही जाहिरातबाजी सुरु असल्याचे सहज स्पष्ट होत असले तरी या फलकांवर लिहिण्यात आलेला मजकूर मात्र समाजमाध्यमांवर चांगलाच टीकेचा धनी बनला आहे. शहरात उपलब्ध नसलेल्या अत्याधुनिक रुग्णालयाची स्तुती करणारे दाम्पत्य, शहरभर खड्डय़ांचे साम्राज्य असतानाही सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनविल्याचे गुणगान गाणारा रिक्षाचालक यांना या फलकांवर स्थान देण्यात आले असल्याने हे फलक म्हणजे भाजपच्या प्रचारा ऐवजी अपप्रचाराचे निमित ठरत आहेत.

महानगरपालिकेचे भाईंदर पश्चिम टेंभा येथील रुग्णालय अद्यप सरकारकडे हस्तांतर झालेले नाही. या रुग्णालयात सर्दी, ताप तसेच इतर किरकोळ आजारांव्यतिरिक्त कोणत्याही गंभीर आजारांवर उपचार करण्याची सुवुधा नाही, प्रसुतीसाठी दाखल झालेल्या अनेक महिलांना आयत्या वेळी खासगी रुग्णालयात पाठविण्यात येते, अनेकवेळा औषध आणि लसींचा तुटवडा याठिकाणी जाणवत असतो. या सर्वाचा परिणाम म्हणजे सर्व सामान्यांना खासगी न परवडणाऱ्या रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. असे असले तरी भाजपच्या जाहिरात फलकावरील दाम्पत्य मात्र शहरात चांगले रुग्णालय असल्याचे गोडवे गात आहे.

अन्य एका फलकावर शहरात काही ठिकाणी सुरु असलेल्या सिमेंट कँक्रीटच्या रस्त्यांचे गुणगान करणाऱ्या रिक्षा चालकाचे छायाचित्र फलकावर लावण्यात आले आहे. सध्या शहरातील बहुतांश रस्ते खड्डेमय झाले आहेत. रस्त्यावरील खड्डय़ांमुळे शनिवारी एका दुचाकीस्वाराचा बळी गेल्याची घटना ताजी आहे, रिक्षाचालकांसह खासगी वाहनचालकांना खड्डे असलेल्या रस्त्यातून वाट काढणे मुश्कील झाले आहे, त्यांच्या वाहनांचे नुकसान होत आहे. असे असताना भाजप मात्र या खड्डय़ांवर कोणतेही भाष्य न करता सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची जाहिरात करण्यात धन्यता मानत आहे. आणखी एका फलकावर चुलीच्या धुरातून मुक्तता मिळाल्याबद्दल गोल्डन नेस्ट येथील रहिवासी असलेली एक महिला धन्यवाद व्यक्त करत आहे. गोल्ड नेस्ट परिसरात बहुतांश इमारतीच आहेत. या इमारतींमध्ये एकतर सिलेंडरद्वारे गॅस जोडणी आहे किंवार नळाद्वारे गॅस मिळत आहे. या भागातील इमारतींमध्ये चुल असणे केवळ अशक्य असलेली बाब आहे. अशावेळी फलकावरील महिलेला चुलीच्या धुरातून मुक्तता मिळाली असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भाजपचे हे फलक शहरात सर्वत्र नाक्या नाक्यावर झळकले आहेत आणि त्याची समाजमाध्यमांवर मात्र जोरदार खिल्ली उडवली जात असून नागरिकांच्या चर्चेचा विषय बनले आहेत.