नीलेश पानमंद/ जयेश सामंत, ठाणे

मुस्लीम, आगरी, कुणबी आणि आदिवासी बहुसंख्य असलेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात काही वर्षांपूर्वी भाजपचे अस्तित्व नव्हते. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची सद्दी होती. २०१४मध्ये नरेंद्र मोदी लाटेत या मतदारसंघाचाही राजकीय चेहरामोहरा बदलला आणि राष्ट्रवादीचे कपिल पाटील भाजपच्या तिकिटावर खासदार झाले. मागील पाच वर्षांत मात्र या मतदारसंघात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. भिवंडी महापालिका हद्दीतील मतदारांनी नुकताच काँग्रेसला एकहाती कौल दिला आहे, तर जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेने खासदार पाटील आणि भाजपचे मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांना धोबीपछाड दिला आहे. खासदार पाटील यांच्या एककल्ली राजकारणामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील बहुसंख्य पदाधिकाऱ्यांना ते नकोसे झाले आहेत. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी तर पाटील पुन्हा निवडून येणे म्हणजे शिवसेनेचे अस्तित्व संपविणे, असाच प्रचार या भागात  सुरू केला आहे. त्यामुळे गेल्यावेळी मोदी लाटेवर स्वार होऊन निवडून आलेल्या पाटील यांना यंदाचा प्रवास सोपा जाणार नाही.

कपिल पाटील यांनी गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांमध्ये स्थान मिळविले. भिवंडी आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही वर्षांत बेसुमार बेकायदा बांधकामे झाली आहेत. येथील अनधिकृत गोदामांमधून महिन्याला कोटय़वधी रुपयांचे भाडे कमवीत उजळ माथ्याने वावरणारे राजकारणी या भागाला नवे नाहीत. अश्विनी जोशी जिल्हाधिकारी असताना त्यांनी यापैकी काही गोदामांवर हातोडा फिरविण्यास सुरुवात करताच येथील राजकीय वर्तुळात पसरलेली अस्वस्थता या भागातील रहिवाशांनी अनुभवली आहे. त्यामुळे जेथे सत्ता तेथे लीन होणे येथील राजकीय नेतृत्वाला अधिक सोयीचे ठरते. खासदार पाटीलही या गोष्टीस अपवाद ठरलेले नाहीत. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता येऊ शकते हे ओळखून त्या दिशेने पावले उचलणाऱ्यांपैकी पाटील एक. हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. शिवसेनेचीही या भागात पाळेमुळे घट्ट आहेत. हा मतदारसंघ पुन्हा काबीज करण्यासाठी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याने या ठिकाणी काटे की टक्कर होण्याची चिन्हे आहेत. शिवसेना आणि भाजपची युती झाली असली तरी सेनेच्या स्थानिक नेत्यांनी भाजपचे विद्यमान खासदार पाटील यांच्याविरोधात दंड थोपटण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी सोपी नसली तरी काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, यावरही मतदार संघातील निकालाचे भवितव्य अवलंबून आहे.

काँग्रेस -शिवसेना मनोमीलन

कपिल पाटील गेली पाच वर्षे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांसोबत दोन हात करीत आहेत. महापालिका, जिल्हा परिषद अशा प्रत्येक निवडणुकीत पाटील आणि शिवसेना नेत्यांमध्ये संघर्ष झाला. या मतदारसंघातील भाजपचे आणखी एक वजनदार आमदार किसन कथोरे यांचाही बदलापूर, मुरबाड पट्टय़ात शिवसेनेशी संघर्ष असून शहापूर विधानसभा क्षेत्रात जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेने एकहाती बाजी मारत पाटील यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे. यातूनच काँग्रेस आणि शिवसेनेत जवळीक वाढली. भिंवडी महापालिकेत काँग्रेस आणि शिवसेना एकत्र सत्तेत आहेत.

खासदार पाटील यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने उमेदवार जाहीर केलेला नाही. माजी खासदार सुरेश टावरे आणि शिवसेनेचे जिल्हा परिषदेतील बांधकाम सभापती सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) या दोघांची नावे उमेदवारीसाठी आघाडीवर असल्याची चर्चा आहे. पाटील आणि म्हात्रे हे हाडवैरी म्हणून ओळखले जातात. त्यात म्हात्रे यांनी पाटील यांच्याविरोधात उघडपणे भूमिका घेतली आहे. काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी बाळ्या मामा यांना उमेदवारीसाठी पाठिंब्याची पत्रे दिली असून उमेदवारीसाठी त्यांची दिल्लीवारी झाल्याचीही मतदारसंघात चर्चा आहे. नाराज शिवसैनिकांच्या मतांचे ध्रुवीकरण करणे म्हात्रे यांना शक्य होईल का याची चाचपणी सध्या काँग्रेसच्या गोटात सुरू आहे.

सुविधांचा अभाव..

भिवंडी शहर असले तरी या ठिकाणी सार्वजनिक वाहतुकीची पुरेशी सुविधा उपलब्ध नाही. अरुंद रस्त्यांवर उड्डाणपुलांची उभारणी केल्यामुळे वाहतूक कोंडी होते. हातमाग आणि यंत्रमाग कारखान्यांचा वीजेचा प्रश्न आहे. मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले असले तरी या ठिकाणी काम सुरू नाही. कल्याण-मुरबाड रेल्वे, रोजगार अशा मुद्दय़ांवर ही निवडणूक होणार आहे.

शिवसेना-भाजप युतीने अद्याप भिवंडीसाठी उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र, ज्यावेळी कपिल पाटील यांची उमेदवारी जाहीर होईल, त्याचक्षणी पक्षाच्या सर्वच पदांचा राजीनामा देईन. माझ्यामुळे युतीतील नेत्यांची अडचण होऊ नये म्हणून हे राजीनामे देणार आहे. तसेच निवडणुकीत पाटील यांच्याविरोधात काम करणार आहे.

 -सुरेश म्हात्रे, शिवसेना

माझ्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध नाही, केवळ एका व्यक्तीचा विरोध आहे. ‘त्या’ व्यक्तीची खासदार होण्याची अतिमहत्त्वाकांक्षा असून त्यात मला काहीच चुकीचे वाटत नाही. मात्र, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून त्यांचा माझ्या उमेदवारीला विरोध नाही. युती असल्यामुळे शिवसैनिक आमच्यासोबतच असतील.

 – कपिल पाटील, खासदार, भाजप

अनेक जण इच्छुक असले तरी अध्यक्ष राहुल गांधी निष्ठावंतांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेऊन माझी उमेदवारी निश्चित करतील, यावर माझा विश्वास आहे. खासदार असतानाही २०१४ ला मला उमेदवारी नाकारण्यात आली. तरीही पक्षाचे काम करीत आहे आणि अडीच वर्षांपासून पक्ष मजबूत करीत आहे. त्यामुळे या मतदार संघात माझा पुन्हा विजय होईल.

 -सुरेश टावरे, माजी खासदार, काँग्रेस