20 November 2019

News Flash

बदलापूरजवळ बिबटय़ाचा मृतदेह

बिबटय़ाची कातडी आणि इतर अवयव शाबूत असल्याने उपासमारीने त्याचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त होत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

तीन आठवडय़ांपूर्वी उपासमारीमुळे मृत्यूची शक्यता

बदलापूर : बदलापूर शहरापासून जवळ असलेल्या ढवळे गावात बुधवारी दुपारी बिबटय़ाचा मृतदेह आढळला आहे. तीन आठवडय़ांपूर्वी या बिबटय़ाचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता व्यक्त होते आहे. बिबटय़ाची कातडी आणि इतर अवयव शाबूत असल्याने उपासमारीने त्याचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त होत आहे.

बदलापूरजवळच्या कासगावच्या डोंगरावर बिबटय़ाचा वावर असल्याचा दावा येथील काही ग्रामस्थांनी केला होता. तसे ठसेही स्थानिकांना आढळून आले होते. मात्र वन विभागाच्या तपासणीत त्याचे काही पुरावे आढळले नव्हते. बुधवारी बदलापूरपासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या ढवळे गावातील राखीव वनक्षेत्रात मृतावस्थेतील एक बिबटय़ा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आढळून आला. वन विभागाचे वनक्षेत्रपाल रमेश रसाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली.

बिबटय़ाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. या बिबटय़ाचा मृत्यू तीन आठवडय़ांपूर्वी झाला असल्याची प्राथामिक शक्यता रमेश रसाळ यांनी व्यक्त केली. तसेच बिबटय़ाच्या शरीरावरील कातडी, त्याची नखे, दात असे सर्व अवयव शाबूत असल्याने त्याचा मृत्यू शिकारीने झाला नसून उपासमार किंवा पाणी न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता रसाळ यांनी व्यक्त केली.

बिबटय़ाचे वय अंदाजे दोन ते अडीच वर्षे असावे असाही अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाच्या पशुधन विकास अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. त्यांच्यातर्फे मृत बिबटय़ाच्या शरीराची पाहणी करून मृत्यूचे कारणमीमांसा करणारा अहवाल मागवण्यात आला आहे.

First Published on May 23, 2019 3:08 am

Web Title: body of leopard found near badlapur
Just Now!
X