अवयवदान हे श्रेष्ठ दान समजले जाते. काही रूढी व गैरसमजुती यांपासून दूर जात सामाजिक भान राखत वसईतील जनता अवयवदानासाठी पुढे येऊ लागली आहे. नुकताच आगाशी येथील किरण रतिलाल व्होरा यांचे मरणोत्तर नेत्रदान व त्वचादान केले.
आगाशी, चाळपेठ येथील टूर्स आणि ट्रॅव्हल्सचा व्यावसाय करणारे किरण रतिलाल व्होरा (६०) यांचे हृदयविकाराने नुकतेच निधन झाले. त्यांना मूत्रपिंडाच्या आजाराशिवाय अन्य कोणत्याही प्रकारचा आजार नसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर नेत्रदान करण्याचा निर्णय त्यांचा मुलगा रितेश व्होरा यांनी घेतला. त्यासाठी रितेश यांनी वसईतील देहमुक्ती चळवळीचे प्रणेते व सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम पाटील यांची भेट घेतली. पुरुषोत्तम पाटील यांनी व्होरा कुटुंबीयांना देहदान व अवयवदानाची महती पटवून दिली. किरण व्होरा यांचा मुलगा रितेश स्वत: वैद्यकीय क्षेत्रात असल्याने त्याने लगेचच आपल्या वडिलांची त्वचा दान करण्याचा निर्णय घेतला. किरण व्होरा यांचा मृतदेह बंगली येथील कार्डिनल ग्रेशस रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला होता. मृत्यूनंतर विशिष्ट वेळेतच अवयवदान करता येते. त्यामुळे लगेचच किरण व्होरा यांची त्वचा व डोळे काढून घेण्यात आले. त्यांची त्वचा नवी मुंबईतील ऐरोलीच्या नॅशनल बर्न सेंटर येथे हलविण्यात आली असून डोळे परळ येथील बच्चू अली नेत्रबँकेत ठेवण्यात आले आहेत.
त्यानंतर अवयवदान आणि देहदान याविषयावर आयोजित पुरुषोत्तम पाटील यांच्या एका कार्यक्रमात रितेश व्होरा यांना वडिलांची त्वचा आणि नेत्रदान केल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले. ‘‘आमच्या जैन समाजामध्ये नेत्रदान हे सर्रास केले जाते; परंतु देहदान आणि अवयवदान यांविषयी फारशी माहिती नव्हती. याबाबत जनजागृती होण्याची गरज आहे, असे रितेश व्होरा यांनी सांगितले.