कल्याण-डोंबिवली महापालिकेचा निर्णय; पाण्याचा निचरा करण्यासाठी तात्काळ उपाययोजना

कल्याण : बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामध्ये अनेक ठिकाणी नाले तुंबून पाणी साचल्यानंतर महापालिकेने आता अशा भागांमध्ये ठोस उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाणी तुंबणाऱ्या २२१ ठिकाणी ५५१ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पावसाचे पाणी तुंबलेल्या भागात पाण्याचा तात्काळ निचरा करणे तसेच त्या ठिकाणी इतर उपाययोजना करणे शक्य होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

कल्याण-डोंबिवली शहरात बुधवारी मुसळधार पाऊस झाला. नाले तुंबल्याने पाणी रस्त्यावर आले. काही गृहसंकुलांमध्येही पाणी साचले. या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. पाणी तुंबणाऱ्या भागांची तात्काळ माहिती मिळावी आणि त्याठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा तात्काळ करता यावा, यासाठी अशा भागांवर पालिका विशेष लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरांमध्ये पाणी तुंबणारी २२१ ठिकाणे असून त्याठिकाणी ५५१ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. पुढील चार महिने पावसाळ्याच्या कालावधीत ही उपाययोजना केली जाणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे अशा भागांवर कसे लक्ष ठेवावे आणि त्याद्वारे साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कशी उपाययोजना करावी, याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि शहर अभियंता सपना कोळी यांनी अधिकाऱ्यांना दिली. येत्या तीन दिवसांत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या कालावधीत कोणतीही दुर्घटना घडल्यास तात्काळ बचाव कार्य करता यावे यासाठी शहरात राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची एक तुकडी तैनात आहे. या पथकाने आयुक्तांसमवेत शहरात अनेक ठिकाणी पाहणी केली.

अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे स्थलांतर

पालिकेच्या १० प्रभागांच्या हद्दीत एकूण ४४७ धोकादायक इमारती आहेत. यामध्ये १६२ अतिधोकादायक, २८५ धोकादायक इमारती आहेत. डोंबिवलीतील फ प्रभागात सर्वाधिक म्हणजे १७४ धोकादायक इमारती आहेत. १६२ पैकी ५० अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना पालिकेने इतरत्र स्थलांतरित केले आहे. उर्वरित इमारतीमधील रहिवाशांना स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. राज्याच्या हवामान खात्याने दिलेला अतिवृष्टीचा इशारा तसेच पावसाळ्याच्या चार महिन्यांच्या कालावधीत कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून ही कार्यवाही केली आहे.