धोकादायक पूल बंद करण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय; डोंबिवली पूर्व-पश्चिम वाहतुकीचा पेच

भगवान मंडलिक, डोंबिवली

डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा कोपर पूल कमकुवत झाल्याने येत्या २७ मे पासून मध्य रेल्वे प्रशासनाने तो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे डोंबिवलीतील पूर्व-पश्चिम वाहतुकीचा संपूर्ण भार ठाकुर्ली उड्डाणपुलावर येणार आहे. हा पूल अरुंद असल्याने या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची चिन्हे आहेत.

हा पूल धोकादायक झाल्याचे सांगत मध्य रेल्वेने तो बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी, याबाबत स्थानिक वाहतूक पोलिसांना कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचे समजते. त्यामुळे जोपर्यंत वाहतुकीचे पर्यायी नियोजन केले जात नाही, तोपर्यंत हा पूल कसा बंद करणार, असा प्रश्न वाहतूक पोलीस अधिकारीच विचारत आहेत.

कोपर उड्डाण पूल बंद केल्यानंतर डोंबिवली पश्चिमेतील कोपर, मोठागाव, उमेशनगर, विष्णुनगर, देवीचा पाडा, गरिबाचा वाडा भागातील वाहनांना महात्मा फुले रस्त्यामार्गे ठाकुर्ली पुलावरून डोंबिवलीचा पूर्व परिसर गाठावा लागणार आहे. डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे स्थानकाजवळील महात्मा फुले रस्ता, नगरसेवक विकास म्हात्रे यांचे कार्यालय ते रागाई मंदिपर्यंतचा रस्ता निमुळता आहे. या रस्त्यावरून फक्त दोन रिक्षा ये-जा करू शकतात. याच रस्त्यावरून शाळेच्या बस, ट्रक, टेम्पो धावू लागले तर हे रस्तेही वाहतूक कोंडीच्या जंजाळात सापडण्याची भीती आहे. ठाकुर्ली पश्चिम पुलाच्या पोहच रस्त्याचा काही भाग निधीच्या तुटवडय़ामुळे जोडण्याचे काम ठेकेदाराने अर्धवट ठेवले आहे. वाहनचालकांना या ठिकाणी वाहने चालविताना कसरत करावी लागणार आहे. भावे सभागृहासमोरून येणारी वाहने गणेश मंदिरकडे जाणाऱ्या पादचारी जिन्याजवळील चिंचोळ्या रस्त्यात अडकून पडण्याची भीती आहे.

डोंबिवली पूर्वेतील वाहनचालक पश्चिमेत येताना घरडा सर्कल ते मंजुनाथ शाळा- प्लाझमा रक्तपेढी- व्ही. पी. रस्ता- स. वा. जोशी शाळा ते ठाकुर्ली पूल या रस्त्याने येणार आहे. जोशी शाळेजवळील रस्ता निमुळता आहे. या रस्त्यावर संध्याकाळी नेहमी कोंडी असते. या रस्त्यावरही कोपर पूल बंद केल्यानंतर भार येणार हे स्पष्ट आहे.  पूर्वेकडील नेहरू उद्यान, जोशी शाळेचा परिसर येथे सकाळ-संध्याकाळ लहान मुले, विद्यार्थ्यांची गर्दी असते. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीचा भार वाढल्यास अपघातांचाही धोका संभवतो.

डोंबिवलीकर धास्तावले

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जुना पत्रीपूल गाजावाजा करीत धोकादायक म्हणून रेल्वेने पाडला होता. हा पूल तीन महिन्यांत उभारला जाईल, अशी घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. सहा महिने उलटले तरी हा पूल राज्य रस्ते विकास महामंडळ आणि मध्य रेल्वेच्या समन्वयाच्या अभावामुळे उभारला गेलेला नाही. पत्रीपुलाजवळच्या दररोजच्या वाहतूक कोंडीने चालक, नोकरदार वर्ग हैराण आहे. त्यात आता कोपर पूल बंद झाल्यास नागरिकांची डोकेदुखी वाढणार आहे.

एवढा महत्त्वाचा निर्णय असूनही यासंदर्भात वाहतूक विभागाला कोणीही कळविलेले नाही. कोपर उड्डाण पूल बंद करणार असतील तर वाहनांसाठी पर्यायी मार्ग कोणते याचा नव्याने अभ्यास करावा लागणार आहे. ठाकुर्ली पूल, परिसरातील पोहच रस्ते अरुंद आहेत. तेथे आताच वाहन कोंडी होत असते. त्यामुळे हा निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल.

एस. एन. जाधव, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग