गेल्या दहा वर्षांतील पोलीस ठाण्यातील गुन्ह्य़ांच्या नोंदींवर नजर टाकली तर कल्याण-डोंबिवली शहरांच्या ६५ किलोमीटर परिघात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये ५० टक्क्यांनी वाढ झाल्याचे चित्र आहे. यापूर्वी शहर परिसरात चोरी करणारा एखादा मातब्बर चोरटा चोरी करून आंबिवलीच्या दिशेने सुसाट निघून जायचा. मातब्बर चोरांचे लपण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे इराणी वस्ती. चोरटा कुठलाही असो, त्याला या वस्तीत कोणाच्या तरी ओळखीने आसरा मिळायचाच. या वस्तीचे वैशिष्टय़ म्हणजे या ठिकाणी चोर, गुंड शोधण्यासाठी पोलीस फौजफाटय़ासह गेले की येथील महिला त्यांच्याभोवती संरक्षणाची भीती उभ्या करायच्या. या आक्रमक महिलांमुळे वस्तीत शिरणेही कठीण असायचे. आता तर बेकायदा बांधकामांच्या सुळसुळाटामुळे जागोजागी अशा वस्त्या उभ्या राहू लागल्या असून त्यामध्येही असे चोर आश्रय घेत आहेत.
चोरी करून आंबवलीच्या इराणी वस्तीत लपून बसलेल्या भुरटय़ा चोरांवर पोलिसांची बाहेरून पाळत असायची, तरीही पोलिसांची नजर चुकवून येथील चोर रात्रीच्या वेळेत आणखी काही चोऱ्या करून वस्तीत परतायचे.या वस्तीवर पाळत ठेवून असलेले कधी तरी महिलांची साखळी मोडून वस्तीत शिरायचे आणि एखाद्याच्या मुसक्या आवळायचे. त्यानंतर या भुरटय़ाचा पोलीस कोठडी, तुरुंगातील प्रवास सुरू  व्हायचा. मग काही महिने तरी शहर परिसरात नियमित होणाऱ्या चोऱ्या, सोनसाखळी खेचण्याचे प्रमाण थांबायचे.  मागील पाच ते सहा वर्षांत मात्र हे समीकरण बदलले आहे. सोनसाखळी चोरीच्या घटना बेसुमार वाढल्या आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे आता गल्लोगल्ली इराणी वस्त्या उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे चोरांना लपण्यासाठी लागणारी आश्रयस्थाने वाढली.
चोरांचे ‘कल्याण’
* टिटवाळा, कल्याण पूर्व भागातील नेतिवली टेकडीवरील वस्ती, डोंबिवलीतील आयरे, भोपर, भिवंडी परिसरातील बेकायदा वस्त्या चोरांचे अड्डे ठरू लागले आहेत.
* गेल्या काही वर्षांत सर्वाधिक सोनसाखळी चोऱ्या कल्याणात घडल्या आहेत.
* डोंबिवलीत एमआयडीसी परिसर, टिळकनगर, चार रस्ता, गांधीनगर, कल्याणमध्ये काळा तलाव, खडकपाडा, मुरबाड रस्ता, आधारवाडी, पूर्व भागात कोळसेवाडी, टिटवाळा या परिसरात सोनसाखळी चोरीच्या घटना अधिक घडतात.   
भगवान मंडलिक, कल्याण