tv12महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या माथेरानमधील डोंगरदऱ्या आणि वृक्षराजींचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आता लवकरच माथेरानमध्ये आकाशातील सौंदर्य पाहण्याची संधी मिळणार आहे. ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांच्या मार्गदर्शनाखाली माथेरान नगरपरिषदेच्या वतीने या ठिकाणी ‘आकाश निरीक्षण केंद्र’ उभारण्यात येत असून पावसाळ्यानंतर हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर या केंद्रात आकाश निरीक्षण, खगोलशास्त्रीय लघुपट, पर्यावरणीय साहित्य पाहण्याची पर्वणी पर्यटकांना लाभणार आहे.
मुंबई-ठाण्यापासून जवळ असल्याने माथेरानमध्ये वर्षांचे बारा महिने मोठय़ा प्रमाणावर पर्यटकांची गर्दी उसळत असते. या पर्यटकांना निसर्गसौंदर्यासोबत अवकाशविषयक माहिती मिळावी, या हेतूने याठिकाणी ‘आकाश निरीक्षण केंद्र’ उभारण्याची कल्पना दा. कृ. सोमण यांनी मांडली होती. ती उचलून धरत रायगड जिल्ह्य़ाचे तत्कालीन जिल्हाधिकारी एच. के. जावळे यांनी यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला.
आठ महिन्यांपूर्वी या केंद्राच्या उभारणीला सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत दोन मजल्यांची इमारत पूर्ण झाली असून त्यात थ्रीडी थिएटर, सभागृहाचे कामही पूर्ण झाले आहे. आता जनरेटर, स्वच्छतागृह, संरक्षक कठडे अशी जुजबी कामे बाकी आहेत. तसेच रात्रीच्या आकाशनिरीक्षणासाठीच्या दुर्बिणीसाठी घुमट उभारण्याचे काम राजस्थानमध्ये सुरू आहे. ही कामे येत्या ऑक्टोबपर्यंत पूर्ण होतील, अशी माहिती दा. कृ. सोमण यांनी दिली. खासगी संस्थेच्या माध्यमातून या केंद्राचे काम सुरू असून नगरपरिषदेचे कनिष्ठ अभियंता देवेंद्र मोरखंडीकर यांच्या देखरेखीखाली हे काम सुरू आहे.

खगोलप्रेमींसाठी पर्वणी
* माथेरानमधील अग्निशमन दलाच्या वास्तूमध्येच हे केंद्र उभारण्यात आले आहे.
* पहिल्या मजल्यावर थ्रीडीपट दाखवणारे ३५ आसनी थिएटर.
* खगोलशास्त्रीय वस्तू, उपकरणे, छायाचित्रे यांच्या प्रदर्शनाची खोली
* इमारतीच्या गच्चीवर आकाश निरीक्षणासाठी दुर्बीण

स्थानिकांना रोजगार
या उपक्रमासाठी स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांना पर्यटकांना आकाश दर्शनाची माहिती देण्यासाठी तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक तरुणांना या उपक्रमातून रोजगार मिळू शकेल. यासाठी एका प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून त्यातून २० तरुणांची निवड करण्यात आली आहे.