भगवान मंडलिक

कल्याण-डोंबिवली महापालिकेचा प्रस्ताव

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील आठ रेल्वे स्थानकांच्या परिसरात रस्त्यांच्या कडेला वाहने उभी करणाऱ्यांना आता त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. सद्य:स्थितीत महापालिका अथवा वाहतूक पोलिसांकडून या वाहनांना कोणत्याही स्वरूपाचे शुल्क आकारणी होत नसल्याने घराजवळ वाहने उभी करण्यासाठी जागा नसलेले शेकडो वाहनमालक रेल्वे स्थानकांलगत रस्त्यांच्या कडेला आपली वाहने उभी करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्थानक परिसरात वाहने उभी करण्यासाठी सम-विषम तारखेनुसार शुल्क आकारणी करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे.

कल्याण, डोंबिवलीत वाहनतळांची पुरेशी व्यवस्था नसल्याने वाहनचालक आपली वाहने रस्त्याच्या कडेलाच उभी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. मध्यंतरी ‘आकार अभिनव कन्सल्टंट’ने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली होती. त्यामध्ये डोंबिवलीतील फडके, नेहरू रस्ता, आगरकर, मानपाडा रस्ता, बालभवन, महात्मा फुले रस्ता, सुभाष रस्ता, म. गांधी मार्गावर दुतर्फा दुचाकी उभ्या करण्यात येत असल्याचे आढळले. कस्तुरी प्लाझाजवळील टाटा लाइनखाली स्टेट बँक टिळक रस्ता ते शिवमंदिर रस्त्यापर्यंत सुमारे दोन हजार दुचाकी आणि १०० हून अधिक चारचाकी वाहने येथे कायमस्वरूपी उभी केलेली असल्याचेही आढळून आले. अशीच परिस्थिती शहाड, टिटवाळा, आंबिवली, कोपर भागांत आहे.

रस्त्यालगत उभी असलेली वाहने वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत असल्याचे आढळल्यानंतर अशा वाहनांच्या चालकांकडून शुल्कवसुली करण्याचा प्रस्ताव कडोंमपाच्या सर्वसाधारण सभेत दोन वर्षांपूर्वीच मंजूर करण्यात आला होता. वाहनतळ शुल्कात दर वर्षी पाच टक्के वाढ करण्याची तरतूदही यात आहे. वाहनतळ नियमांचा भंग केल्यास चालकाकडून पाचपट दंड वसूल करण्यात येणार आहे. गृहसंकुल, शाळेच्या बस थांब्यांसाठी मासिक शुल्क आकारणी करण्यात येणार आहे, असे महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले.

शुल्क आकारणीची पद्धत

* रेल्वे स्थानकापासून २०० मीटर परिघातील रस्त्यांवर कायमस्वरूपी वाहने उभी करण्यास मज्जाव. स्कायवॉकखाली वाहनतळ सुविधा पुरवण्यात येईल.

* सभागृह, मनोरंजन केंद्र, मॉल या रस्त्यांवर दुचाकीसाठी १० ते ४० रुपये, तर चारचाकी वाहनांसाठी २५ ते १५० रुपये शुल्क आकारणी.

* रेल्वे स्थानकापासून २०० ते १५०० मीटर परिघातील रस्त्यांवर सम-विषम तारखांना वाहन पार्किंगची सुविधा. सात मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यावर मासिक पास तत्त्वावर निवासी वाहनतळ सुविधा. वाहनांच्या प्रकारानुसार दहा रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत शुल्क आकारणी.

* रेल्वे स्थानकापासून १५०० मीटरच्या पुढील क्षेत्रात निवासी नागरिकांच्या वाहनांना शुल्क आकारणी. या भागात १० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंतची शुल्कवसुली.

महासभेने मंजूर केलेल्या वाहनतळ शुल्क प्रस्तावाप्रमाणे डोंबिवली परिसरातील रस्त्यांवर वाहनचालकांकडून शुल्कवसुली करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. या प्रकरणी अभिकर्ता नेमण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

– सुभाष पाटील, कार्यकारी अभियंता, डोंबिवली