औद्योगिक आणि नागरी सांडपाण्यामुळे गटारगंगा झालेल्या वालधुनी नदीच्या पात्रात पुन्हा एकदा रसायने सोडल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. त्यामुळे रविवारी सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत नदी किनारच्या नागरिकांना रासायनिक दरुगधीचा सामना करावा लागला. अंबरनाथ नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने फेस आणि पाण्याचा मारा करून दरुगधीची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही सोमवार पहाटेपर्यंत दरुगधी जाणवत होती. या प्रकारानंतर सोमवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वालधुनी नदीची पाहणी केली.

अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीत पुन्हा एकदा रासायने सोडल्याचा प्रकार समोर आला आहे. शनिवारी मध्यरात्री किंवा रविवारी पहाटेच्या सुमारास वालधुनी नदीत ही रसायने सोडण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. रविवारी सकाळपासून अंबरनाथ पूर्वेतील आणि नदीकिनारी असलेल्या उल्हासनगरच्या विविध भागांत रासायनिक दरुगधी पसरल्याचे जाणवले. याबाबत नागरिकांकडून अंबरनाथ नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला सातत्याने कळवण्यात येत होते. अंबरनाथ पालिकेच्या अग्निशमन दलाच्या वतीने काटई कर्जत महामार्गावरील ज्या पुलाखाली गेल्याच महिन्यात रसायनाचे अंश आढळले होते त्या ठिकाणी फेसाळ पाण्याचा मारा केल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख भागवत सोनोने यांनी दिली आहे. तसेच दिवसभर आणि मध्यरात्री एक वाजेपर्यंत वालधुनी नदीच्या शिवमंदिर पुलाचा भाग, रिलायन्स रेसिडेन्सी या ठिकाणी फेसाळ पाणी आणि साध्या पाण्याचा मारा करण्यात आला होता. त्यानंतरही सनागरिकांना दरुगधीपासून मुक्तता मिळाली नाही. रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे स्थानिक अधिकारी आणि अंबरनाथ नगरपालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी या दरुगधीचा स्रोत शोधण्याचा प्रयत्न करत होते.

२०१४च्या घटनांची पुनरावृत्ती

सहा वर्षांपूर्वी २९ नोव्हेंबर २०१४ रोजी वालधुनी नदीच्या पात्रात रसायने सोडल्याने हाहाकार माजला होता. या प्रकारामुळे उल्हासनगर शहरातील वालधुनी नदी किनारचे अनेक नागरिक अत्यवस्थ झाले होते. अनेकांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली होती. तसाच मात्र कमी तीव्रतेचा प्रकार रविवारी झाल्याचा अंदाज व्यक्त होतो आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनीही अशाच प्रकार झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. बाहेरच्या औद्योगिक वसाहतीतल्या कंपन्यांमधून रसायने टँकरमध्ये भरून वालधुनीच्या पात्रात सोडले जात आहेत. सहा वर्षांनंतरही या प्रकारांना आळा घालण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळ अपयशी ठरल्याचेही स्पष्ट झाले आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कल्याणचे प्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे यांना याबाबत वारंवार संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर सोमवारी सकाळपासून वालधुनी नदी आणि एमआयडीसी परिसरात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी पाहणी करत असल्याची माहिती मिळाली आहे.