इतर शहरांच्या तुलनेत चिकन, मटन, मासे १० ते २० टक्क्यांनी महाग
भाजी महाग..फळे महाग..घरे महाग..प्रवास महाग..डोंबिवली शहरातील महाग वस्तूंची यादी संपता संपत नाही. याच यादीमध्ये समावेश होतो तो मांसाहार आणि मत्स्याहाराचा..डोंबिवली शहरामध्ये मांसाहार करणाऱ्यांसाठी इतर शहरांच्या तुलनेत अधिक पैसे मोजावे लागतात. ठाणे आणि कल्याण या आसपासच्या शहरांचा विचार करता डोंबिवलीत मिळणारे मासे इथे १० ते २० टक्क्यांनी महाग असल्याचे आढळून येते. माशांमध्ये पापलेट, कोळंबी, सुरमई, सरंगा, बांगडा हे मासे खाल्ले जात असले तरी त्यांच्या किमती किलोमागे ४०० ते ८०० च्या आसपास पोहचल्या आहेत, तर छोटय़ा वाटय़ांच्या किमतीही २००च्या घरात पोहचल्या आहेत. अन्य शहरात मिळणाऱ्या माशांपेक्षा या किमती १० ते २० टक्क्याने अधिक आहेत. हीच बाब मांसाहाराच्या बाबतीतही लागू होते.
पावसाळा संपल्यानंतर गारठा वाढू लागला की, मांसाहारी खवय्ये कोंबडीकडून माशांकडे वळू लागतात. उन्हाळ्यामध्येही मांसाहाराबरोबरीने मत्स्याहाराचाही सिलसिला सुरू राहतो. प्रदूषणामुळे समुद्रातील माशांची संख्या घटते आहे. पण मत्स्यप्रेमींची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे. मागणी आणि पुरवठय़ाचे गणित बिनसल्यामुळे घाऊक बाजारात माशांच्या किमती वाढायला लागल्या आहेत. परंतु डोंबिवलीमध्ये त्याच किमती प्रचंड वाढू लागल्या आहेत. डोंबिवलीमध्ये घाऊक मासे विक्रीसाठी मोठे मार्केट नाही. विष्णूनगर पोलीस ठाण्याजवळ असलेल्या मार्केटवर संपूर्ण शहराची भिस्त आहे. याशिवाय अनेक छोटे छोटे बाजार शहराच्या विविध भागांत आहेत. मात्र इथे येईपर्यंत येणारा प्रवास खर्च आणि माशांची साठवणुकीसाठीचा खर्च यामुळे डोंबिवलीतील किमती जास्त आहेत असे येथील विक्रेते सांगतात.
डोंबिवलीच्या परिसरामध्ये जवळचे बंदर नाही. त्यामुळे कुलाबा आणि मुंबईतून येणाऱ्या माशांवरच या शहराची गुजराण होत असेत. लोकसंख्या प्रचंड वाढली असली तरी माशांचा पुरवठा मात्र तेवढाच आहे. त्यामुळे माशांच्या किमती वाढल्या असून खरेदीला येणारा डोंबिवलीकर विक्रेता सांगेल त्या किमतीमध्ये मासे खरेदी करतो. या मोसमात पापलेट, कोळंबी, सुरमई, सरंगा, बांगडा हे माशांच्या किमती इतर शहरांच्या तुलनेत १० ते २० टक्क्यांनी जास्त आहे. मांदेली, बोंबील, करंदीच्या भावातही साधारणपणे तेवढीच वाढ होते. छोटय़ा-मोठय़ा अशा सर्वच माशांच्या दरात हाच फॉम्र्युला आढळून येतो आहे. त्यामुळे डोंबिवलीमध्ये मासे खाणाऱ्यांची तोंडे आंबट झाली आहेत.

कोंबडी, मटनही महागच..
डोंबिवलीत कोंबडी, मटन महाग मिळत असून ठाणे आणि कल्याण या आसपासच्या शहरांच्या तुलनेत हे दरही मोठे आहे. इतर शहरांच्या तुलनेत डोंबिवलीचे चिकन आणि मटनाचे भाव ३० ते ४० रुपयांनी जास्त आहे. बॉयलर जिवंत कोंबडीचे दर ठाण्यात १३० व कल्याणमध्ये १६० असताना डोंबिवलीत हा दर १७० हून अधिक आहे, तर गावठी कोंबडय़ांचे ठाण्यात २२०, कल्याणमध्ये २२० असताना डोंबिवलीमध्ये हा दर २५० इतका आहे, तर मटनाच्या किमती डोंबिवलीमध्ये ४४०हून अधिक आहेत.