सहा अल्पवयीन मुलांना अटक
नालासोपाऱ्यात नऊ वर्षांंच्या मुलावर लैंगिक अत्याचार करून त्याचे अश्लिल चित्रफित बनविण्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले असून याप्रकरणी तुळींज पोलिसांनी ६ अल्पवयीन मुलांना अटक केली आहे.
पिडित मुलगा नालासोपारा पुर्वेच्या नगिनदास पाडा येथे राहतो. गेल्या सात महिन्यापासून त्याच परिसरात राहणारी काही मुले त्याच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. या कृतीची त्यांनी मोबाईल मध्ये अश्लिल चित्रफितही बनवली होती. याच अश्लिल चित्रफितच्या आधारे ते या मुलाला ब्लॅकमेलिंग करून त्याच्यावर अत्याचार करत होते. बुधवारी ही ६ मुले पुन्हा त्या लहान मुलावर जबरदस्ती करत असता त्याने विरोध केला. तेव्हा त्याला मारहाण करण्यात आली. हा प्रकार एका मुलाने पाहिला आणि त्याच्या कुटुंबियांना माहिती दिली. रात्री त्याच्या पालकांनी याबाबत तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनंतर तुळींज पोलिसांनी रात्री ६ मुलांना अटक केली. त्यांच्याकडून मोबाईल जप्त केला असून तो न्यायवैद्य्क प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे.
अटक केलेली मुले अल्पवयीन असून १३ ते १५ वर्ष वयोगटातील आहे. केवळ एक मुलगा १८ वर्षांंचा आहे. या सर्व मुलांवर पोक्सो आणि अनैसर्गिक बलात्काराच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 14, 2016 1:09 am