ठाण्यातील विचित्र घटना
ठाण्यातील वेदांत रुग्णालयानजीक गुरुवारी रात्री झालेल्या रुग्णवाहिकेच्या स्फोटात एक दिवसाच्या अर्भकाचा करुण अंत झाला. या घटनेत एक डॉक्टर व परिचारिकाही जखमी झाले. परिसरातील काही घरांच्या काचाही फुटल्या, तर अन्य एका रुग्णवाहिकेला आग लागली.
भिवंडीतील काल्हेर भागातील मनीष जैन यांची पत्नी कीर्ती बुधवारी रात्री प्रसूत झाली. जन्मलेले बाळ अशक्त असल्याने त्याला उपचारासाठी वर्तकनगरमधील वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने मनीष यांनी त्याला सांताक्रूझमधील सूर्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेतला आणि रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला. त्यानुसार, गुरुवारी रात्री सूर्या रुग्णालयाची रुग्णवाहिका बाळाला नेण्यासाठी ठाण्यात आली होती. या रुग्णवाहिकेमध्ये एक डॉक्टर आणि परिचारिका होती. हे दोघे जण बाळा घेऊन रुग्णवाहिकेत बसून रुग्णालयात बसले, तर चालक आणि बाळाचे वडील रुग्णवाहिकेबाहेर उभे होते. त्याच वेळी रुग्णवाहिकेत मोठा स्फोट झाला. स्फोटामुळे परिसरात मोठा आवाज झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. या स्फोटामध्ये एक दिवसाच्या बाळाचा होरपळून मृत्यू झाला, तर डॉक्टर आणि परिचारिकेने रुग्णालयातून उडय़ा मारल्याने जखमी झाले. या दोघांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, रुग्णवाहिकेतील स्फोट नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समजू शकलेले नसून त्यासंबंधीचा तपास सुरू आहे. विविध तज्ज्ञांना वाहनांच्या तपासणीसाठी बोलविण्यात आले असून त्यांच्या अहवालानंतर स्फोटाचे कारण स्पष्ट होईल. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त व्ही. बी. चंदनशिवे यांनी दिली.

प्रादेशिक परिवहन विभागाकडे स्फोट झालेल्या रुग्णवाहिकेची नोंदणी दीड वर्षांपूर्वी झाली असून २८ जुलै २०१४ अशी रुग्णवाहिकेच्या नोंदणीची तारीख आहे. दीड वर्षे जुनी गाडी असल्याने तिचा फिटनेस व्यवस्थित असावा. त्यामुळे स्फोटाचे वेगळेच कारण असण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.