बेरोजगारीमुळे आर्थिक विवंचनेतून मार्ग कसा काढावा यांची चिंता
प्रोबेस एन्टरप्राईसेस कंपनीच्या परिसरातील पाच ते सहा कंपन्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. काही कंपन्या बेचिराख झाल्या आहेत. या कंपन्यांमधील तिन्ही पाळ्यांत काम करणाऱ्या कामगारांना आता करायचे काय, या चिंतेने ग्रासले आहे. येत्या २० दिवसांत मुलांच्या शाळा, महाविद्यालये सुरू होतील. हातात पगार पडला नाही तर ही परिस्थिती कशी हाताळायची, असा मोठा प्रश्न काही कामगार बोलून दाखवीत आहेत.
प्रोबेस एन्टरप्राईसेस कंपनीच्या परिसरातील कंपन्या मागील तीस ते पस्तीस वर्षांपासून विविध प्रकारची उत्पादने घेत आहेत. कंपनीअंतर्गत किरकोळ घटना वगळता असा मोठा हादरा या परिसरातील कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी यापूर्वी अनुभवला नव्हता. कंपनीतील काम हेच आमचे रोजीरोटीचे साधन आहे. या साधनावर आमच्या कुटुंबाचा गाडा चालतो. गुरुवारी दुपारी प्रोबेसबरोबर लगतच्या कंपन्या आगीने होरपळत असताना अनेक कामगारांना अक्षरश: हुंदके अनावर होत असल्याचे चित्र दिसत होते. आपले उपजीविकेचे साधन आगीत धगधगत असताना या कामगारांना हतबल होऊन भयावह चित्र पाहावे लागत होते. आगीच्या ठिकाणी जाण्याकडचे सर्व रस्ते पोलिसांनी चारही बाजूंनी बंदिस्त केले होते. आजूबाजूच्या भयाण आणि भीषण परिस्थितीने आम्हाला हतबल केले, अशी खंत यापैकी काही कामगारांनी व्यक्त केली. पोटच्या गोळ्यासारख्या वाढविलेल्या कंपन्यांची राखरांगोळी झाल्याने कंपनीचालक स्थितप्रज्ञ अवस्थेत गेले आहेत.
डोंबिवली एमआयडीसीतील बहुतांशी उद्योजक हे स्थानिक आहेत. शहरातील सामाजिक संस्था, रोटरी क्लब व अन्य सेवाभावी उपक्रमांत नियमित त्यांचा सक्रिय सहभाग असतो. ज्या गावात आम्ही राहतो तेथे उत्पादन प्रक्रिया करताना कशाला प्रदूषण करू, असे यापैकी अनेक कारखानदारांचे म्हणणे आहे.
दरम्यान, कामगार म्हणजे आमच्या कुटुंबातील एक घटक आहेत. तीस वर्षांपासून अनेक कामगार कंपनीत काम करीत आहेत. त्यामुळे एका दुर्घटनेनंतर त्यांना वाऱ्यावर सोडणे योग्य नसते. काही झाले तरी कामगारांवर कोणताही अन्याय होणार नाही याची दखल प्रत्येक कंपनीमालक घेईल, असे काही उद्योजकांनी सांगितले. प्रोबेस एन्टरप्राईसेस कंपनीच्या परिसरात पाच ते सहा कंपन्या पूर्णपणे बेचिराख झाल्या आहेत. या कंपन्यांमधील कामगार गुरुवारपासून सुन्न झाला आहे. दररोज तीन पाळ्यांमध्ये काम करण्याची सवय लागलेला कामगार घरी बसावे लागणार या चिंतेने त्रस्त आहे.

१५ फूट खड्डय़ाचे गूढ कायम
डोंबिवली : प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोटाने या ठिकाणी पंधरा फूट खोल खड्डा पडला आहे. बॉयलरच्या स्फोटाने एवढा मोठा खड्डा पडू शकतो का, यावरून आता उद्योग वर्तुळात तर्कवितर्क सरू झाले आहेत. या खड्डय़ाचे गूढ अद्याप कायम असून या ठिकाणी कार्यरत असलेल्या कंपन्यांमधील उद्योजकही हा खड्डा पाहून चक्रावले आहेत. न्यायवैद्यक तपासणी विभागाकडून अहवाल आल्यानंतर याचा उलगडा होईल, असे बोलले जाते.
प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोटाने कंपनीत सुमारे पंधरा फूट खोल खड्डा पडला आहे. कंपनीत स्फोट घडण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. मात्र गुरुवारचा स्फोट हा भीषण स्वरूपाचा होता. याचे परिणाम दोन ते तीन किमी परिसरात दिसून आले आहेत. या घटनेला भेट देणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांनी येथील उद्योग हलवावे अशी मागणी केल्याने लघु उद्योजकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सरकारला जर खरंच रासायनिक उद्योग हलवायचे वा बंद करायचे असतील तर त्यांनी ते करावेत किंवा अंबरनाथला हलवावेत. मात्र अतिरिक्त अंबरनाथ येथे बफर्स झोन आहे त्या जागेत निवासी संकुलांना परवानगी देण्यात आली आहे. मग काही वर्षांनी अंबरनाथ येथूनही हे कारखाने हटवा अशी मागणी होईल याकडे काही उद्योजक लक्ष वेधत आहेत. या स्फोटाच्या दणक्याने सर्व परिसर दणाणून गेला आहे. घरांच्या, दुकानांच्या काचा फुटल्या. घरांची पडझड झाली आहे. डोंबिवलीतील रासायनिक उद्योगांना अखेरची घरघर लागली असून शासन मदत करीत नाही, अशी येथील उद्योजकांची जुनी तक्रार आहे. औद्योगिक विकास महामंडळ केवळ कागदी घोडे नाचवितात.

खड्डयाबाबत उत्सुकता
कंपनीत पंधरा फूट खोल खड्डा पडला आहे. हा खड्डा पडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. काही उद्योजकांच्या मते असा खड्डा केवळ आरडीएक्सच्या वापराने पडू शकतो. रासायनिक विभागातील लघुउद्योजकांमध्ये एवढा मोठा खड्डा पडण्यामागील नेमकी कारणे काय, याविषयी कमालीची उत्सुकता असून काहींनी यासंबंधी तज्ज्ञांसोबत विचार विनिमय सुरू केले आहेत.