नाताळनिमित्त घरोघरी पारंपरिक खाद्यपदार्थ बनवण्याची लगबग

नाताळ सणानिमित्त वसईत घरोघरी खमंग पदार्थाचा सुवास दरवळू लागला आहे. फुगे, चिरोटे, उंबरे, रेवाळे, भरडीचे लाडू, शिंगोळय़ा, इंदोलो, पानकडय़ा आदी विविध पारपंरिक पदार्थ तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. विविध प्रकारचे केक आणि वारूणी म्हणजे वाइनही घरोघरी तयार केली जात आहे.

वसईमधील गावांमध्ये ख्रिस्ती समाज मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे या भागात नाताळ सण मोठय़ा उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. वसईतील ख्रिस्ती समाजाला मराठमोळी संस्कृतीची झालर असल्याने मराठी संस्कृतीची झलक या सणात पाहायला मिळते. दिवाळीत बनवल्या जाणाऱ्या लाडू, करंज्या आणि शंकरपाळ्या या खाद्यपदार्थासह विविध पारपरिक खाद्यपदार्थ येथे बनवले जातात. शिंगोळ्या हा त्यातील एक पारंपरिक खाद्यपदार्थ. वसईत घरोघरी हा पदार्थ बनवला जातो, असे वसईतील शीला लोपीस यांनी सांगितले.

वसईच्या अनेक भागात चिरोटेही बनवण्यात येतात. त्यांना बोलीभाषेत खजल्या असे म्हणतात. काजू किंवा बदामापासूनमॅझिपॅन बनवले जाते. त्यासाठी रात्रभर भिजवलेले काजू किंवा बदामांत गुलाबपाणी, साखर, लोणी, दूध, पाणी घालून मंद आचेवर आटवून त्यांना थापून वडय़ा पाडल्या जातात. लहान मुलांचा आवडता प्रकार जुजूबही घरीच बनवण्यात येतो. त्यासाठी पपईचा रस, साखर आटवून त्याच्या वडय़ा पाडून साखरेचे दाणे भुरभुरले जातात.

नाताळच्या दिवशी जेवणासाठीही विशेष पदार्थ बनवले जातात. त्यामध्ये, तांदूळ आणि उडदाच्या डाळीपासून फुगे हा पारंपरिक पदार्थ बनवण्यात येतो. हे मिश्रण ताडीमध्ये घालून आंबवून तळले जातात, असे रिटा रॉड्रिक्स यांनी सांगितले.

खोबरे, पिठीसाखर, अंड यांपासून कुकीज बनवल्या जातात. डिप फ्राय कुकिजही बनवण्यात येतात, त्यांना रोझा किंवा रोझ कुकीज म्हणतात. तांदूळ, उडदाच्या डाळीचे आंबवलेले मिश्रण थाळीवर पसरवून वाफवले की चांदणी तयार केली जाते. इडलीच्या मिश्रणाचे सालने बनवले जातात. तांदूळ आणि उडीद डाळीच्या आंबवलेले मिश्रण तव्यावर लहान गोलाकार आणि जाडसर पसवून भाजले जातात, त्यास पोळे असे म्हणतात. याच मिश्रणाला पातळ आणि मोठे गोलाकार तव्यावर पसवून भाजले की त्यास चिटापे किंवा शितापे असे म्हणतात. रेवाळे आणि पानकडय़ा हे पारंपारिक पदार्थ उत्तर वसईत बनवले जातात.

इंदेलो हा वसईतील प्रसिद्ध पदार्थ आहे. कोंडीचे मांस आणि डुक्कराच्या वज्री, काळीज यापासून तो तयार केला जातो, चिकन करी, मटन करी बनवण्यात येते. शाकाहारी जेवणात पालेभाज्या, फळभाज्या, मिक्स पालेभाज्या तर येथील प्रसिद्ध वालवांग्याचे भरीत आणि घेवडा-वांग्याची भाजी बनवण्यात येते, अशी माहिती रोझी फर्नांडिस यांनी दिली.

ढेस्का हा नाताळचा आणखी एक पारंपारिक खाद्य्पदार्थ आहे. जो पाण्यात भिजवलेल्या कोवळ्या केळफुलांचा किस, तांदळाची पीठ, शेंगदाणे, वाल, कोलंबी इत्यादी पदार्थांचे मिश्रण करून केळीच्या पानावर थापून निखाऱ्यावर भाजला जातो. वारूणी अर्थात वाईन घरीच बनवली जाते.