पालकमंत्र्यांच्या ‘स्थगिती’ घोषणेची अनंत तरे यांच्याकडून खिल्ली

ठाणे महापालिका हद्दीतील गावठाण तसेच कोळीवाडय़ांना समूह विकास योजनेतून वगळण्याच्या जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेची शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांनी खिल्ली उडवली आहे. तरे यांनी या संदर्भात थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच पत्र पाठवले असल्याने समूह विकास योजनेच्या मुद्दय़ावर शिवसेनेतील शिंदे विरुद्ध तरे हा संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे. एखादा पालकमंत्री ज्याचा त्या खात्याशी संबंध नाही तो ‘क्लस्टर’सारख्या योजनेस कसा काय स्थगिती देऊ शकतो, तसेच ही तात्पुरती स्थगिती म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांच्या मानेवर ठेवलेली तलवार तर नाही ना, असा सवाल तरे यांनी या पत्रात उपस्थित केला आहे.

ठाणे महापालिकेने अधिसूचित केलेल्या समूह विकास योजनेबाबत मोठय़ा संख्येने हरकती नोंदवत गावठाण तसेच कोळीवाडय़ातील ग्रामस्थांनी या योजनेला कडाडून विरोध केला आहे. ठाण्यातील काही राजकीय नेतेमंडळीही उघडपणे क्लस्टरला विरोध करत असून यात शिवसेनेतील नेत्यांचेच प्रमाण अधिक आहे. पालिका क्षेत्रातील ग्रामीण भागातून समूह विकास योजनेला होणारा हा विरोध भविष्यात निवडणुकीत महागात पडू शकेल, अशी धास्ती शिवसेनेच्या नेतेमंडळींना वाटू लागली आहे. त्यामुळे ठाण्याचे पालकमंत्री व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन समूह विकास योजनेतून गावठाण आणि कोळीवाडे वगळण्याचे जाहीर केले. तसेच यासंबंधीच्या अधिसूचनेवर तात्पुरती स्थगिती देत असल्याचे जाहीर केले. पालकमंत्र्यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेतील एका मोठय़ा गटाने सुटकेचा श्वास सोडला असला तरी पक्षाचे उपनेते आणि ठाण्याचे माजी महापौर अनंत तरे यांनी मात्र िशदे यांच्यावर पलटवार केला आहे.

कोळी समाजाचे नेते असलेले अनंत तरे यांनी यासंबंधी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून पालकमंत्री अशा स्वरूपाची स्थगिती देऊ शकतात का, असा सवाल उपस्थित केला आहे. एखादा पालकमंत्री ज्याचा त्या खात्याशी संबंध नाही तो तात्पुरत्या स्थगितीचे आदेश कसे काय देऊ शकतो, अशी एकेरी भाषा या पत्रात वापरण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये खळबळ उडाली आहे. ही तात्पुरती स्थगिती म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांच्या मानेवर ठेवलेली तलवार आहे, अशी टीकाही तरे यांनी केली आहे. पालकमंत्र्यांनी जाहीर केलेल्या या स्थगितीविषयी भूमिपुत्रांच्या मनात शंका असून ही स्थगिती नेमकी किती दिवस रहाणार असा टोलाही तरे यांनी पत्रात लगाविला आहे. दरम्यान, तरे यांच्या पत्रावर पालकमंत्री िशदे यांनी रात्री उशिरापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. मागील विधानसभा निवडणुकीत तरे यांनी िशदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून संघर्षांचे रणिशग फुंकले होते. मातोश्रीच्या हस्तक्षेपानंतर मात्र तरे यांनी तलवार म्यान केली होती. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत महेश्वरी तरे यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. त्यानंतर तरे हे ठाण्यातील राजकारणातून बाजूले फेकले गेल्याचे चित्र आहे.