विजय भोईर यांचे पालिकेला पत्र

शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांच्या पत्नी शंकुतला म्हात्रे यांना आपण कोणत्याही गाळ्याची विक्री केलेली नाही. म्हात्रे कुटुंबियांनी आपण त्यांना गाळे विकल्याचे बोगस खरेदीखत के ले आहे. आपल्या बोगस स्वाक्षऱ्या या कागदपत्रांवर करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या कर विभागाकडून त्या गाळ्यांना कर आकारणी करून घेतली आहे, अशी तक्रार विजय बामा भोईर यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कर विभागाकडे केली आहे.

महापालिका आयुक्त ई. रवींद्नन यांनी नगरसेवक वामन म्हात्रे यांना बेकायदा बांधकाम प्रकरणी नगरसेवक पद रद्द करण्याची नोटीस बजावली आहे. त्यांच्या पत्नी शंकुतला म्हात्रे यांच्या नावाने असलेला गाळा आपण विजय भोईर यांच्याकडून खरेदी खताने खरेदी केला आहे, अशी माहिती म्हात्रे कुटुंबांकडून ह प्रभाग अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. या खरेदी खतावरून तत्कालीन प्रभाग अधिकारी शांतीलाल राठोड यांनी शंकुतला म्हात्रे यांचे नाव बेकायदा बांधकाम यादीतून वगळले होते. आपला बेकायदा बांधकामाशी संबंध नसल्याची माहिती नगरसेवक वामन म्हात्रे यांनी ‘लोकसत्ता ठाणे’ला दिली होती.

दरम्यान, याविषयी विजय भोईर यांनी ‘लोकसत्ता ठाणे’कडे खुलासा करताना अशा प्रकारची कोणतीही मिळकत आपण विकलेली नाही, असा दावा केला आहे. गाळ्यांचे बोगस खरेदी खत तयार करून त्यावर आपल्या बोगस स्वाक्षऱ्या करून महापालिकेकडून कर लावून घेण्यात आला आहे. यासंदर्भात पालिकेकडे, शासनस्तरावर आपण पाच वर्षांपासून तक्रारी करीत आहोत, पण त्याची दखल घेतली जात नाही. तत्कालीन, प्रभाग अधिकारी शांतीलाल राठोड यांनी या बोगस खरेदी खताच्या आधाराने शकुंतला म्हात्रे यांना क्लीन चीट दिली आहे. ही क्लीन चीट देताना पालिकेने आपली कोणतीही सुनावणी घेतली नाही, असे विजय भोईर यांनी स्पष्ट केले. पालिकेने या गाळे प्रकरणातील सत्य शोधून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी भोईर यांनी केली आहे.