ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात शिकविण्यात येणाऱ्या विविध कलांचा आधार येथील रुग्णांना मिळू लागला आहे. रुग्णालयाच्या व्यवस्थापनामार्फत दिल्या जाणाऱ्या विशेष मार्गदर्शनातून गेल्या काही महिन्यांपासून रुग्णांना संगणकाचे धडेही गिरवले जाऊ लागले आहेत. विशेष म्हणजे संगणक अभ्यासामुळे बऱ्याच रुग्णांची मानसिक स्थिती सुधारण्यात मदत होत असून काहींचा आत्मविश्वासात भर पडू लागल्याचे मनोरुग्णालयात व्यावसायिक उपचारपद्धत देणाऱ्या चारू पुराणिक आणि जान्हवी केरझरकर यांनी सांगितले.
या उपचारासाठी वेगळा कक्ष देण्यात आला आहे. हा कक्ष सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत चालू असतो. यामध्ये कागदाच्या पिशव्या तयार करणे, फुले तयार करणे, पणत्या बनविणे, राख्या, दिवे तयार करणे आदी प्रकारच्या अनेक गोष्टी येथे तयार करून त्या विकल्या जातात. अशा प्रकारचे कक्ष तयार करण्यामागे रुग्णांशी संवाद साधणे, रुग्णांना वास्तवाचे भान आणणे, स्वत: विषयीची जाणीव निर्माण करणे आदी गोष्टींची काळजीही या माध्यमातून घेतली जाते. अनेक प्रदर्शनात रुग्णांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्रीदेखील केली जाते. या विक्रीतून येणारे पैसे वस्तू तयार करण्यासाठी लागणाऱ्या प्राथमिक गोष्टीच्या खरेदीसाठी वापरले जातात. यातील ३० टक्के रुग्ण हे घरी जाण्याच्या मन:स्थितीत नसतात. रविवारी कक्षेला सुट्टी देण्यात येते. तेव्हा हे सर्व रुग्ण कक्षा उघडण्याची वाट पाहात असतात. यावेळी पुरुष कक्षेत अशा प्रकारचे काम चालू असून तेथेही दररोज ५०-६० पुरुष सहभाग दर्शवतात. रुग्णांची संख्या दिवसाला कमी-जास्त होत असते. त्यावेळी तेवढेच रुग्ण रुग्णालयात नव्याने प्रवेश करतात.

मनोरुग्णालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा रुग्णांना लवकर बरे होण्यासाठीही फायदा होत आहे. .या रुग्णांना मनोरुग्णालयात असल्यासारखे वाटत नाही आणि यातून त्यांच्या मनाची स्थिती बदलण्यास सुरुवात होते.
चारू पुराणिक,प्रशिक्षक