पालिका आयुक्तांचा निर्णय

ठाणे : करोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदान लवकर व्हावे आणि अशा रुग्णांना तात्काळ उपचार मिळून त्यांचे प्राण वाचावेत, या उद्देशातून महापालिका प्रशासनाने चाचण्यांची संख्या चौपट केली आहे. आता कोविड चाचणीसाठी डॉक्टर शिफारशीची अट रद्द करण्याचा निर्णयही महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी मंगळवारी घेतला आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी आरोग्य विभागाला दिले असून यामुळे नागरिकांना डॉक्टर शिफारशीविनाच करोना चाचणी करणे शक्य होणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये विविध प्रयोगशाळांमार्फत करोनाची चाचणी करण्यात येते. मात्र, या चाचणीसाठी महापालिका डॉक्टरांच्या शिफारशीची अट लागू करण्यात आली होती. त्यामुळे एखाद्या रुग्णाला चाचणी करायची असेल तर महापालिकेच्या आरोग्य केंद्रातील डॉक्टरांकडून शिफारस पत्र घ्यावे लागत होते. या पत्राशिवाय प्रयोगशाळा चाचणी करत नव्हत्या. तसेच खासगी डॉक्टरांनाही अशा प्रकारचे शिफारस पत्र देण्यास बंदी घालण्यात आली होती. शहरामध्ये सर्वच प्रयोगशाळांना दिवसाला एकूण सुमारे एक हजार चाचण्या करण्याची परवानगी होती. त्यामुळे या चाचण्यांमध्ये करोना लक्षणे दिसून येणाऱ्या नागरिकांना प्राधान्य मिळावे, यासाठी प्रशासनाकडून अशा प्रकारचे निर्बंध घालण्यात आले होते. मात्र, महापालिका प्रशासनाने आता करोना चाचण्यांची संख्या चौपट केली असून यामुळे चाचण्यांसाठी डॉक्टर शिफारशीची अट रद्द केल्याचे महापालिका सूत्रांकडून सांगण्यात आले. तर संशयित रुग्णांची योग्य वेळी चाचणी करून त्यांना वेळीच अलगीकरण केले तर करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल, या उद्देशातून हा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.