ठाणे महापालिका निवडणूकीत शिवसेना आणि भाजपची युती तुटली असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादीची मात्र आघाडी झाली आहे. आघाडीतील जागा वाटपाच्या सुत्रावर दोन्ही काँग्रेसने शिक्कामोर्तब केले असून १३३ पैकी ७७ जागांवर राष्ट्रवादी तर उर्वरीत ५४ जागांवर काँग्रेस लढणार आहे. कळवा-मुंब्य्रातील जागा वाटपावरून दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, राष्ट्रवादीने कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात काँग्रेसला जागा देऊ केल्याने आघाडीचा तिढा सुटला आहे.

ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होईल की नाही, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. शहरातील जागांवर दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांचे एकमत झाले होते. मात्र, कळवा-मुंब्य्रातील जागा वाटपावरून आघाडीचे घोडे अडले होते. कळवा-मुंब्रा परिसरात वर्चस्व असल्याने राष्ट्रवादीचे नेते या भागातील जागा काँग्रेसला सोडण्यास तयार नव्हते. तसेच शहरातील जागा वगळता कळवा-मुंब्य्रात मैत्रीपुर्ण लढत लढण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ठेवला होता. मात्र, हा प्रस्ताव काँग्रेसच्या नेत्यांना मान्य नसल्यामुळे आघाडीत बिघाडी निर्माण झाली होती. अखेर राष्ट्रवादीने कळवा-मुंब्य्रातील जागा सोडण्याचा निर्णय घेतल्याने आघाडी होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. असे असतानाच काँग्रेसच्या नेत्यांनी आठ जागांवर दावा केला.