ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात गेल्या काही दिवसांमध्ये करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होते आहे. रविवारी शहरात ६२ जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले होते. यानंतर सोमवारी तब्बल ६४ जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आल्यामुळे शहरात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. आतापर्यंत एकूण करोनग्रस्त रुग्णांचा आकडा ७४४ वर पोहचला असून या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यात स्थानिक प्रशासन पूरतं अपयशी ठरताना दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून अंबरथान शहरात याआधी बाधित व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचे अहवाल पॉजिटीव्ह येण्याचं प्रमाण वाढलं आहे. आतापर्यंत २० जणांनी करोनाशी लढताना आपले प्राण गमावले आहेत. शहरातील २७२ जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु असून १४२ जणांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शहरातील १७ भाग प्रतिबंधित केले आहेत. आतापर्यंत ३१० रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. मात्र समुह संसर्गातून रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात कशी ठेवायची हा प्रश्न स्थानिक प्रशासनासमोर उभा राहिला आहे.