ठाणे :  ठाणे जिल्ह्य़ात काही दिवसांपूर्वी दररोज आढळणारी रुग्णसंख्या ६ हजारांच्यापुढे गेल्यामुळे जिल्ह्य़ाची चिंता वाढली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्य़ामध्ये दररोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येत घट होऊन ती ३ हजारांच्या आत आली आहे. असे असतानाच जिल्ह्य़ात दररोज रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अडीच हजारावरून आता पाच हजारांपर्यंत पोहचले आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील करोनासंसर्ग ओसरण्याबरोबरच रुग्ण करोनामुक्तीचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे.

ठाणे जिल्ह्य़ात गेल्या १० ते १५ दिवसांपासून रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा एकदा घसरू लागला आहे. सुमारे महिन्याभरापूर्वी जिल्ह्य़ात पाच ते सहा हजार करोनाबाधित रुग्ण आढळून येत होते. तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे केवळ दोन ते अडीच हजार होते. बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा करोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त होती. त्यामुळे जिल्ह्य़ातील अनेक करोना रुग्णालयांमध्ये खाटाच शिल्लक नसल्याचे चित्र होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्य़ातील करोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. जिल्ह्य़ात दररोज सरासरी साडेचार ते पाच हजार रुग्ण उपचार घेऊन बरे होत आहेत. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. या भागात दररोज एक ते दीड हजार रुग्ण बरे होत आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच करोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. यामुळे रुग्णांचा तात्काळ शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करणे शक्य होत आहे. तसेच गृह विलगीकरणातील रुग्णांनी इतरत्र फिरून करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आरोग्य कर्मचारी अशा रुग्णांवर विशेष लक्ष देत आहेत. त्यामुळे करोनाची साखळी तुटत असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

गृह विलगीकरणातील रुग्णांवर प्रशासनाचे लक्ष आहे.जिल्ह्य़ात चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. रुग्णांचे लवकर निदान होत असल्यामुळे ते इतरांच्या संपर्कात कमी येत असून यामुळेही संसर्ग वाढण्याचे प्रमाण कमी झाले आहे. ठाणे जिल्ह्य़ात टाळेबंदीमुळे विनाकारण बाहेर पडणाऱ्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. जिल्ह्य़ात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.

राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण

तारीख         रुग्ण बरे  होण्याचे प्रमाण

२८ एप्रिल             ५२९५

२९ एप्रिल             ४८८१

३० एप्रिल             ३९६१

१ मे                   ४७५०

२ मे                   ४९७३

३ मे                   ४५९८

४ मे                   ५२५९

एकूण                ३३७१७