करोनाबाधितांच्या संख्येत जिल्ह्यात घट

 

ठाणे : जिल्ह्याात गेल्या पंधरवड्यापासून दररोज आढळणाऱ्या करोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने दररोज नऊशेपेक्षा कमी रुग्ण आढळून येत आहेत. त्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. दोन आठवड्यांपूर्वी १५ हजारांहून अधिक असलेली उपचाराधीन करोना रुग्णांची संख्या दहा हजारांपेक्षा खाली आली आहे. रुग्णांना वेळेवर उपचार मिळत असल्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही घटले आहे.

मार्च महिन्याच्या अखेरीपासून जिल्ह्यात करोनाचा शिरकाव होण्यास सु़रुवात झाली होती. जून, जुलै आणि सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात दररोज १ हजार ५०० हून अधिक करोना रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या २ लाखांहून अधिक झाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही परिस्थिती नियंत्रणात येऊ लागली आहे. करोनाची बाधा झालेल्या २ लाख १० हजार ९९ जणांपैकी १ लाख ९४ हजार ८८२ बाधित करोनामुक्त झाले आहेत. करोनामुक्त होणाऱ्यांचे हे प्रमाण ९२.७६ टक्के इतके आहे. तर, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ९ हजार ९१३ इतकी आहे. हे प्रमाण एकूण रुग्ण संख्येच्या ४.१८ टक्के इतके अत्यल्प आहे.

मृत्यूचे प्रमाणही कमी

जिल्हा आरोग्य विभागाने तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासकांनी करोनाकाळात कृत्रिम श्वसन यंत्रणा आणि ऑक्सिजनच्या सुविधा पुरेशा प्रमाणात उभारल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांनाही तात्काळ उपचार मिळू लागले आहेत. त्यामुळे करोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे. महिन्याभरापूर्वी दररोज करोनामुळे जिल्ह्यात ४० हून अधिक करोना रुग्णांचा मृत्यू होत होता. मात्र, सध्या हेच प्रमाण २५ पेक्षाही कमी झाले आहे.