१० हजार शौचालये कागदोपत्री असल्याचा आरोप; कोटय़वधीचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय

प्रसेनजीत इंगळे, लोकसत्ता

वसई : वसई-विरार महापालिकेने शहरातील नागरिकांसाठी १० हजार शौचालये बांधल्याचा दावा केला असला तरी ही शौचालये केवळ कागदोपत्री असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाचा कोटय़वधीचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय असून महापालिका प्रशासनाने याबाबत तपास केला जाईल, असे सांगितले.

केंद्र शासनाने २०१४मध्ये स्वच्छ भारत योजने अंतर्गत घरोघरी शौचालय असावे या उद्देशाने ही योजना सुरू केली. या योजने अंतर्गत घरगुती शौचालयासाठी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद यांच्याकडे अर्ज केल्यानंतर लाभार्थ्यांला शहरी भाग असेल तर केंद सरकारकडून आठ हजार, राज्य सरकारकडून आठ हजार आणि महापालिकेकडून काही रक्कम अशा प्रकारे एकूण २० हजार ८०० रुपये लाभार्थ्यांला दिले जातात. मात्र या योजनेअंतर्गत शहरातील अनेक नागरिकांनी पालिकेकडे अर्ज केले. पण त्यांना दोन वर्षे उलटूनही शौचालये मिळाली नाही. याबाबत बसपाचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रा. धर्मशील खरे यांनी माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागवली असता या योजनेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला. खरे यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत पालिकेने शहरात किती शौचालये बांधली याची माहिती मागविली होती. पालिकेने दिलेल्या माहितीत सुरुवातील त्यांना तफावत आढळली. महापालिकेने ३५ कोटी रुपये खर्च करून मार्च २०१७ पर्यंत १० हजार ६०७ शौचालये बांधल्याचे सांगितले. खरे यांनी लाभार्थ्यांची यादी मागवली असता अनेक अनियमितता असल्याचे आढळून आले.

अनेकांनी स्वखर्चाने शौचालये बांधली असून, महापालिकेला आधारकार्ड, घरपट्टी, बँक पासबुक अशी कागद पत्रे जमा केली आहेत. महापालिकेने या लाभार्थ्यांच्या नावे कागदोपत्री लाभाचा सहा हजाराचा पहिला हप्ता जमा केल्याचे दाखवले आहे. प्रत्यक्षात मात्र या लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारे पैसे मिळाले नसल्याचे उघड झाले आहे.

विरार पूर्वेच्या चंदनसार परिसरातील कांता जाधव या लाभार्थी महिलेने स्वखर्चातून बांधलेल्या शौचालयाला महापालिकेने स्वच्छ भारत अभियानातून शौचालय बांधल्याचा फलक लावला आहे. विरार पूर्वेच्या कातकरी पाडा येथे राहणारे सुकरू रामा पवार यांनी दोन वर्षांपासून अर्ज केला आहे. पण त्यांच्या नावावर सहा हजार त्यांच्या खात्यात जमा केल्याचे दाखवण्यात आले आहेत.

महापालिकेने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. याबाबत पालिकेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांच्याशी संपर्क साधला असता ठेकेदारांमार्फत शौचालये बांधल्याची माहिती दिली. महापालिकेने १०,६०७ शौचालये बांधली असून त्यात कोणताही भ्रष्टाचार झाला नाही. काही लोकांना पैसे मिळायचे आहेत, पण शासनाचा जसा निधी उपलब्ध होतो, त्याप्रमाणे आम्ही लाभार्थ्यांना पैसे देत आहोत, असे ते म्हणाले.

कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार झालेला नाही. अनेक लाभार्थ्यांनी जुने शौचालय रंगवून पैसे उकळले आहेत, तर ठेकेदारांनीच जास्त शौचालये बांधली आहेत. त्यांनाच अजून पैसे मिळालेले नाहीत.

– राजेंद्र लाड, कार्यकारी अभिंयता

 

या संदर्भात माझ्याकडे अजून कसलीच माहिती नाही. सविस्तर माहिती घेऊन अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला आहे का ते तपासले जाईल

– माधव जवादे, शहर अभियंता

महापालिकेने दिलेली शौचालये ही केवळ कागदोपत्रीच असून लाभार्थ्यांच्या नावाने महापालिकेने कोटयवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी.

– प्रा. धर्मशील खरे, बसपा जिल्हाध्यक्ष