लोकसत्ता प्रतिनिधी

विरार :  वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य विभागात गुरुवारी कोविड १९ ची लस आली आहे. १६ जानेवारीपासून कोविडची लस  देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ५७५३ आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार असून सात हजार लसीचे डोस पालिकेच्या आरोग्य विभागात दाखल झाल्या आहेत.

बहुचर्चित करोना लस देण्याचा निर्णयम् झाल्यानंतर शासनाकडून विविध महापालिकांना साठा पाठविण्यात आला आहे. वसई विरार महापालिकेला गुरुवारी सात हजार लसींचा साठा पाठवण्यात आला. शनिवारपासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे. या लसीकरणाबाबत माहिती देताना पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा वाळके यांनी सांगितले की,  कोविन अ‍ॅपद्वारे नोंदणी झालेल्या रुग्णाला ही लस दिली जाणार आहे. आतापर्यंत पहिल्या टप्प्यात शासकीय व खासगी क्षेत्रात वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांची नोंदणी सुरू आहे. गुरुवापर्यंत ५ हजार ७५३ नोंदी झाल्या असून त्यांना शुक्रवारपासून  वसई पूर्ववरून इंडस्ट्रीजमध्ये स्थापित केलेल्या कोविड उपचार केंद्रात लसीकरण  दिले जाणार आहे. यासाठी महापालिकेने पाच पाचच्या संखेने  १० वेगवेगळे समूह तयार केले आहेत. यामध्ये  १ डॉक्टर, दोन साहायक कर्मचारी, आशा वर्कर, आणि १ सुरक्षारक्षक असणार आहे.  एका केंद्रात दिवसभरात १०० लाभार्थ्यांंना लस देण्यात येणार असून १० केंद्रांतून दिवसाला १ हजार लाभार्थ्यांंना लस देण्यात येणार आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने ५० हजार लसीचे डोस ठेवण्याची व्यवस्था निर्माण केली आहे. पहिल्या टप्प्यात पहिला डोस दिलेल्या लाभार्थ्यांंना २१ ते २८ दिवसाच्या दरम्यान दुसरा डोस देण्यात येणार आहे. दोन डोस दिल्यानंतर काही आपत्कालीन समस्या निर्माण झाल्यास त्यासाठी ‘ए एफ आय’ टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. यात एक हृदयरोगतज्ज्ञ, एक चेस्ट फिजिशियन, तसेच एक न्यूरोसर्जन असणार आहेत. यासाठी पालिकेने २ खाजगी आणि २ शासकीय रुग्णालये राखीव ठेवली आहेत.       लस दिल्यानंतरसुद्धा त्याची तपासणी केली जाणार आहे. सध्या आजारी, गर्भवती महिला तथा लहान मुलांना लसीकरणातून वगळण्यात आले आहे.

उत्साहात स्वागत

पालिकेच्या आरोग्य विभागाने गुरुवारी कोविड १९ वरील उपचारासाठी आलेल्या ‘कोविडशिल्ड’ या लसीचे मोठय़ा उत्साहात स्वागत केले. पालिका वैद्यकीय अधिकारी सुरेखा वाळके यांनी आरती ओवाळत पूजा केली तसेच  नारळ वाढवून या लसीचे डोस खास तयार केलेल्या शीतगृहात ठेवले.

चार हजार लशी मीरा-भाईंदरमध्ये 

मीरा-भाईंदर महानगरपालिकेत   सुमारे चार हजार लस आल्या असून पहिल्या टप्प्यात  ६ हजार २८७ जणांना लस दिली जाणार आहे. १६  जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार आहे. पहिला डोस दिल्यानंतर २१ दिवसांनंतर दुसरा डोस दिला जाणार आहे