प्रशांत घोडविंदे, युवा वार्ताहर
आसाममधील गुवाहाटी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा विभागातर्फे ‘राष्ट्रीय एकात्मता शिबिराचे’ आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी विविध राज्यांतील विद्यापीठांतून राष्ट्रीय सेवा विभागातील स्वयंसेवकांना आमंत्रित करण्यात आले होते. मुंबई विद्यापीठातून या शिबिरासाठी २० स्वयंसेवकांची जिल्हास्तरावरून निवड करण्यात आली होती. जीवनदीप शैक्षणिक संस्थेच्या खर्डी महाविद्यालयातून आनंद रोज आणि कोलम बेदरकर तसेच गोवेली महाविद्यालयातून मसब जुवारी या स्वयंसेवकांची निवड राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठी झाली होती. मुंबई विद्यापीठाच्या वतीने खर्डी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्राचार्य एस. वि. देशमुख यांची स्वयंसेवकांचे प्रमुख म्हणून निवड झाली होती.
या सातदिवसीय एकात्मता शिबिरामध्ये विविध स्वयंसेवकांनी आपापल्या राज्यांतील पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवले. त्याचबरोबर देशातील विविध भाषांची ओळख करून दिली. या शिबिरात स्वयंसेवकांसाठी व्यक्तिमत्त्व विकास कौशल्य शिबीर, लिंग समानता, डिजिटल इंडिया व भारताची विविधता या विषयावरील कार्यशाळा, क्रीडास्पर्धा, मोनोअ‍ॅक्ट, गायन आणि पोस्टर मेकिंग इत्यादी उपक्रम आयोजित केले होते. यावेळी मुंबई विद्यापीठातील स्वयंसेवकांनी राज्याचा ऐतिहासिक वारसा, लोकगीते व आदिवासी नृत्य सादर केले होते. देशातील विविधतेतील एकतेचे प्रदर्शन घडवून आणणे हा या राष्ट्रीय एकात्मता शिबिराचा उद्देश होता.
एकात्मक शिबिराचा समारोप आसामचे राज्यपाल पद्मनाभ बालकृष्ण आचार्य यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना त्यांनी आपली संस्कृती आणि भाषेमध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टींचा आपल्याला अभिमान वाटायला हवा. स्वयंसेवकांनी या गोष्टींचे अनुकरण करायला हवे. पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करण्याची आवश्यकता नाही, असे सांगितले.

महाविद्यालयाबाहेरील विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन
प्रतिनिधी, ठाणे</strong>
महाविद्यालये नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करीत असतात. वेगवेगळे शोधप्रकल्प, अद्ययावत ग्रंथालय, प्रयोगशाळा आदी अद्ययावत सोयी देऊन विद्यार्थ्यांच्या ज्ञानात जास्तीत जास्त भर कशी पडेल यासाठी ते प्रयत्नशील असतातच. मात्र ठाण्याच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयाने महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्तही आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी प्रयत्न केले आहेत. यासाठी महाविद्यालयातील एनएसएस विभागाच्या विद्यार्थ्यांनीही पुढाकार घेतला आहे.
महाविद्यालयाने यंदा परिसरातील १०-१५ गरजू विद्यार्थ्यांना ग्रंथालय उपलब्ध करून दिले आहे. तसेच खास संस्कार शिबीर भरवून त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जात आहे.यावेळी एनएसएस विद्यार्थ्यांनी वह्य़ांच्या उरलेल्या पानांचा वापर करून नव्या वह्य़ा बनवल्या. गरजू विद्यार्थ्यांना या वह्य़ांचे वाटप करण्यात आले. या शिबिरात प्राध्यापक, शिक्षक, विविध सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला आहे. पुढील पाच वर्षे या मुलांना महाविद्यालयातर्फे मार्गदर्शन देण्यात येणार आहे. त्यामुळे या मुलांचे भवितव्य उज्ज्वल होईल, असा विश्वास जोशी-बेडेकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुभाष शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

वंदे मातरम् महाविद्यालयात ‘मेक इन इंडिया’चे धडे
प्रतिनिधी, ठाणे
भारतातल्या उद्योगविश्वाला गती यावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हाती घेण्यात आलेला मेक इन इंडिया हा उपक्रम सध्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी मदत करीत आहे. देशातल्या देशातच औद्योगिक उत्पादन अशा दर्जाचे तयार व्हायला हवे की, त्याच्या निर्मितीतले भारतीयपण अभिमानाने मिरवता यायला हवे. यासाठी या उपक्रमाची निर्मिती करण्यात आली. आता हा उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावा यासाठी विविध महाविद्यालयांमध्ये मेक इन इंडियाचे धडे गिरवले जात आहेत.
कोपर येथील वंदे मातरम् महाविद्यालयामध्ये अलीकडेच मेक इन इंडिया संमेलन आणि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. आजवर केवळ औद्योगिक क्षेत्रांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साकारलेल्या मेक इंडियाचे स्वप्न पुढे सरसावत होते, परंतु शैक्षणिक क्षेत्रांनीही यामध्ये सहभाग घेऊन या स्तुत्य उपक्रमाचा एक भाग व्हावा, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. यावेळी संस्थेचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार कोल्हे, इंडिया टेक इंटरनॅशलन कंपनीचे संचालक हरीश चंदार आणि रॉयल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तसेच संपूर्ण भारतभरातून ऑनलाइन यंत्रणेच्या माध्यमातून अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमास हजेरी लावली.

भाषा संशोधन केंद्राद्वारे विद्यार्थ्यांचा भाषेचा अभ्यास
वझे केळकर महाविद्यालयाचा उपक्रम
जतिन तावडे, युवा वार्ताहर
वझे केळकर महाविद्यालयामध्ये रसायानशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र या विज्ञान शाखेच्या प्रयोगशाळांबरोबरच वाणिज्य विषयातील विविध बाबी प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी कॉमर्स लॅब, विद्यार्थ्यांना भाषा विषय नीट समजावा व लिहिता यावा यासाठी भाषा संशोधन कक्ष (लॅन्ग्वेज लॅब), पुस्तकातील धडे व त्या धडय़ांमधील मुद्दय़ांची अधिक माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी ई-लर्निग लॅब तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अंध विद्यार्थ्यांसाठी विशेष ग्रंथालय सुरू केले आहे.
तंत्रज्ञानाच्या युगात संगणक आणि भ्रमणध्वनी अशा यांत्रिक वस्तू विद्यार्थ्यांच्या जीवनाचे अविभाज्य घटक बनले आहेत. याच यांत्रिक घटकांचा वापर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी, त्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी, वाणिज्य आणि भाषा अशा शाखांबद्दलचे त्यांचे पुस्तकी आणि प्रात्यक्षिक ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी या विशेष डिजिटल प्रयोगशाळा महाविद्यालयाने सुरू केल्या आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.बी. शर्मा यांनी दिली. महाविद्यालयातील कॉमर्स लॅबमध्ये विद्यार्थ्यांना स्मार्ट टीव्हीच्या आधारे शेअर मार्केट व ऑनलाइन ट्रेडिंगबद्दल माहिती सांगितली जाते. तसेच शेअर मार्केमधील प्रात्यक्षिकेही दाखवली जातात. तसेच बँकेमध्ये, आयकर आणि वित्त विभागात लागणारे अर्ज कशा प्रकारे भरायचे, त्यांची गणना कशा प्रकारे करायची, तसेच कंपनी फॉर्मेशन म्हणजे काय व त्यासाठी कुठच्या बाबींची पूर्तता करणे आवश्यक असते. अशा अनेक विषयांचा अंतर्भाव यात आहे. भाषा तंत्रज्ञान संशोधन केंद्रात एकावेळी १२ विद्यार्थ्यांना भाषा व त्याचे विविध पैलू, देशोदेशीच्या भाषांमध्ये पडणारा फरक अशा भाषा संबंधित विविध गोष्टी, ऑडिओ, व्हिडीओ, लिखित व व्हर्बल घटकांद्वारे शिकवले जातात. या प्रयोगशाळेत भाषा ही वाचन, कथन, श्रवण व लिखाण अशा महत्त्वाच्या चार गोष्टींद्वारे संगणकाच्या माध्यमातून शिकवली व समजावली जाते. या प्रयोगशाळेचे वैशिष्टय़ म्हणजे येथे प्राध्यापक कक्षात नसताना विद्यार्थी संगणकावर अभ्यास करू शकतात. विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास प्राध्यापक तपासू शकतात व त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या भाषा सुधारणांकडे विशेष लक्ष देता येते. ई- लìनग प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना इंटरनेट, व्हच्र्युअल क्लासरूम व डिजिटल कोलॅबरेशनच्या माध्यमातून एखाद्या विषयाची पुस्तकाबाहेरील माहिती सांगितले जाते व येथे विद्यार्थी आपल्या गतीने एखादा विषय समजावून घेऊ शकतात.
 किन्नरी जाधव