शास्त्रीय संगीतातील गायन-वादनाच्या मैफली ऐकणे आणि पाहणे हा रसिकश्रोत्या कानसेनांसाठी अवर्णनीय अनुभव असतो. दिग्गज गायक-वादकांबरोबरच उदयोन्मुख कलावंतांच्या मैफलींनाही श्रोते तितक्याच मनमोकळेपणे दाद देत असतात. सध्या मुंबई-ठाणे परिसरात शास्त्रीय संगीताच्या मैफलींचा मौसम सुरू आहे. शास्त्रीय संगीतातील सुप्रसिद्ध बासरीवादक विवेक सोनार यांच्याही एकल वादनाच्या मैफली होत असतात. गुरुकुल अ‍ॅकॅडमीतर्फे जवळपास २५० विद्यार्थ्यांना बासरीच्या शिक्षणातून या अलौकिक वाद्याचा प्रसार आणि प्रचार करण्याचा वसा विवेक सोनार यांनी घेतला आहे.
आवडती गाणी – गुरुजी पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी वाजविलेली ‘हिरो’ चित्रपटातील बासरीची धून, त्याचबरोबर सुवर्णसुंदरी चित्रपटातील ‘कुहू कुहू बोले कोयलिया’, ‘ऐरणीच्या देवा तुला’, ‘दुनियादारी’ या चित्रपटातील ‘टिक टिक वाजते..’ हे गाणं शास्त्रीय संगीतातील एखाद्या अलंकारासारखे आहे. बासरीसाठी खास बनलेलं गाणं म्हणजे ‘रोजा जानेमन’.
आवडते मराठी चित्रपट – ‘पिंजरा’, ‘कटय़ार काळजात घुसली’
आवडते हिंदी चित्रपट – ‘युगपुरुष’, ‘बॉम्बे’
आवडते अभिनेते – कमल हसन, अमिताब बच्चन
आवडत्या अभिनेत्री – मीनाकुमारी, ऐश्वर्या राय
आवडते लेखक – पु. ल. देशपांडे
आवडते शास्त्रीय गायक – उस्ताद अमीर खान साहेब, पं. भीमसेन जोशी
आवडत्या शास्त्रीय गायिका – गानसरस्वती किशोरीताई आमोणकर
आवडता खाद्यपदार्थ – खानदेशातील पाटवडय़ाची मसाला भाजी
आवडता फूडजॉइण्ट – मामलेदार मिसळ, विष्णूनगरमधील न्यू गजानन वडापाव
आवडती हॉटेल्स – खोपटचे ‘फिशलॅण्ड’, तीन हात नाक्यावरील ‘हॉटेल साईमाँ’, चरईतील प्रभा पोळीभाजी केंद्र
एक आठवण – ठाण्यात २००७ साली देशात प्रथमच बासरी उत्सवाचे आयोजन केले. तेव्हापासून दरवर्षी हा उत्सव भरवितो. गुरुजी पं. हरिप्रसाद चौरसिया आवर्जून येतात, माझ्यासह माझ्या विद्यार्थ्यांनाही भरभरून आशीर्वाद देतात. ते क्षण खूप मनात जपून ठेवावेत असेच आहेत. एकदा गुरुजी म्हणाले एकाच वेळी एकदम १००-१५० लहानमोठय़ा वयाचे विद्यार्थी बासरीवादन करतात हे अलौकिक दृश्य डोळ्यात साठवून ठेवावे असे आहे. ते म्हणाले, ठाणे शहराचे नाव ‘वेणुगड’ असे ठेवायला हरकत नाही. त्यांनी असे म्हटल्यावर मला झालेला आनंद अवर्णनीयच! आपल्या गुरूंची शाबासकी, कौतुकाचे बोल हे पुरस्कारांसमान अभिमानास्पद वाटण्याजोगे आहेत.
ठाण्याविषयी – माझे पहिले गुरू पं. पुरुषोत्तम अंतापूरकर यांच्याकडे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सांगितले बासरीचे पुढील शिक्षण पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्याकडे घ्या. म्हणून १९९७ साली ठाण्यात राहायला आलो आणि वांद्रे येथे गुरुजींकडे शिक्षणास सुरुवात केली. मात्र तेव्हा प्रथम ठाण्यात आलो तेव्हापासून ठाण्यातच अनेक ठिकाणी राहिलो आहे. बदलते ठाणे अनुभवले आहे. सर्वसाधारणपणे दोन कलाकार एकत्र एकाच मंचावरते येणे ही तशी दुर्मीळ बाब. परंतु गेल्या तीन वर्षांपासून युनिटीतर्फे ठाण्यातील शास्त्रीय संगीतातीतल सगळे कलावंत एकत्र येतात, कार्यक्रम सादर करतात ही अलौकिक गोष्ट म्हणावी लागेल. सुरुवातीला ठाण्यात फक्त पं. राम मराठे स्मृती उत्सव व्हायचा; परंतु आता अनेक महोत्सव महापालिकेच्या पाठिंब्याने भरविले जातात. माझ्यासारख्या कलावंतांना पोषक असे वातावरण ठाण्यात निर्माण होत गेले आणि ठाण्याची ही सांस्कृतिक श्रीमंती हाच ठाण्याचा विशेष आहे असे मला वाटते. म्हणूनच ठाण्यात राहायला आल्यानंतर लोकमान्य नगर, टेंभी नाका, चरई अशा ठिकाणी भाडय़ाच्या घरात राहिलो, आता स्वत:चे घर वर्तकनगरला आहे. परंतु ठाण्याबाहेर जाऊन राहण्याचा विचारही करू शकत नाही.

– सुनील नांदगावकर