कोंडदेव मैदानात क्रिकेट सामन्यांसाठी धावपट्टीवर खोदकाम

शहरातील बहुतेक क्रीडाप्रकारांतील खेळाडूंच्या सरावासाठी हक्काचे ठिकाण असलेल्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये सध्या रणजी क्रिकेटचे सामने खेळवण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. मात्र याचा फटका अन्य क्रीडापटूंना बसू लागला आहे. क्रिकेटच्या मैदानाच्या सज्जतेसाठी अ‍ॅथलेटिक्स प्रकारांतील खेळांसाठीच्या धावपट्टीवर खोदकाम करण्यात येत आहे. त्यामुळे मैदानात सरावासाठी येणाऱ्या धावपटूंना मात्र अडथळा शर्यत पार करावी लागत आहे.

ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये सर्वच प्रकारच्या क्रीडा प्रकारांचा सराव सुरू असतो. या स्टेडियममध्ये गेल्या ३० वर्षांपासून क्रिकेट आणि अ‍ॅथलेटिक्स खेळाचा सराव केला जातो. पाच ते सहा क्लबचे पाचशे ते सहाशे खेळाडू या ठिकाणी खेळाचा सराव करत असतात. स्टेडियममध्ये खेळलेले अनेक अ‍ॅथलेटिक्स खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर १५ खेळाडू यशस्वी झालेले आहेत. महाराष्ट्रात ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स क्रीडा प्रकारात पहिल्या क्रमांकावर आहे. प्रत्येक वर्षांला दहा ते बारा अ‍ॅथलेटिक्सची पदके आणून देतात. त्यामुळे  जिल्ह्य़ातील अ‍ॅथलेटिक्स खेळाडूंसाठी हे स्टेडियम महत्त्वाचे आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून रणजी क्रिकेटच्या तयारीसाठी मैदानात काम सुरू  असून यात अ‍ॅथलेटिक्स खेळाडूंच्या धावपट्टीवर हे खोदकाम सुरू आहे, यामुळे सराव करणे कठीण जात आहे, असे पालक शकील अहमद  म्हणाले.

क्रिकेटच्या सामन्यांविषयी विरोध नाही. मात्र रणजी क्रिकेटच्या सामन्यांची तयारी करताना अ‍ॅथलेटिक्स खेळाडूंच्या सरावात अडथळा निर्माण होत आहे. याची दखल घ्यायला हवी. मैदानाचे काम करताना प्रशिक्षकांना, संघटनेला विश्वासात घेऊन काम करणे अपेक्षित आहे.

– दत्ता चव्हाण, उपाध्यक्ष,  ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक संघटना