नवरस आर्ट अ‍ॅकॅडमी आणि रंगशारदा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, १ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता वांद्रे रेक्लमेशन येथील रंगशारदा सभागृहात ‘आराधना’ या कथ्थक नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘विविध वाद्ये आणि त्यांचे विविध स्वभाव’ या संकल्पनेवर कथ्थक आणि फ्यूजन नृत्याविष्कार सादर केले जाणार आहेत. यात सतार, जलतरंग, बासरी, ढोलकी, तबला, हार्मोनियम या वाद्यांचा अंतर्भाव आहे. कार्यक्रमाची संकल्पना व नृत्य दिग्दर्शन नृत्यअलंकार राधिका फणसे यांचे आहे. त्यांच्या विद्यार्थिनीही त्यांच्यासोबत सादरीकरणात सहभागी होणार आहेत. सुप्रसिद्ध गीतकार स्वानंद किरकिरे आणि अभिनेता सचिन खेडेकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सर्व नृत्यप्रेमी रसिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य आहे. संपर्क- ९८२०७११३१६.

दीनानाथमध्ये ‘श्रवण सोहळा’ सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनात नेहमीच वेगळे कार्यक्रम सादर करणाऱ्या सूत्रधार या संस्थेतर्फे श्रवण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात मंगळवार, २९ सप्टेंबर या दिवशी रात्री आठ वाजता हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक व प्रसिद्ध प्लॅस्टिक सर्जन डॉ. रवीन थत्ते यांचे ‘ज्ञानेश्वरीतील विज्ञान’ या विषयावर व्याख्यान होईल. उत्तरार्धात सध्याच्या आघाडीच्या निवेदिका धनश्री लेले या ‘सांगे कबीर’ या विषयाच्या माध्यमातून संत कबीर यांचा जीवनपट उलगडणार आहेत. संपर्क- ९८१९३४०१४६.

‘वाद्य त्रिवेणी’

स्वरांकुर या संस्थेतर्फे ‘वाद्य त्रिवेणी’ या संगीत मैफलीचे आयोजन २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता जुहू येथील इस्कॉन सभागृहात करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध बासरीवादक आणि पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य पं. रूपक कुलकर्णी, व्हायोलिनवादक कैलाश पात्रा आणि सारंगीवादक फारूक लतीफ अशा तीन दिग्गजांच्या वाद्यांची ‘वाद्य त्रिवेणी’ आणि तालमणी पं. मुकुंदराज देव यांच्या तबल्याची त्यांना साथ असा योग जुळून येणार आहे. या वाद्य त्रिवेणीबरोबरच भजन गायक अनुप जलोटा यांची भजनसंध्या ऐकण्याची संधीही संगीतप्रेमींना मिळणार
आहे. सर्वासाठी हा कार्यक्रम खुला आहे.