जिवाचे काही बरेवाईट होईल या भीतीने सध्या कल्याण-डोंबिवलीतील नागरिक निव्वळ नावापुरत्या असलेल्या पदपथावरून चालण्याची कसरत करीत आहेत. गुरुवारी ही कसरत एका वृद्ध महिलेच्या जिवावर आली होती, पण बोटावर निभावली. वाहनांच्या गजबजाटातून स्वत:ला वाचवून रस्ता ओलांडताना तोल जाऊन ही महिला गटारात पडली. बंदिस्त गटारासाठीच्या लोखंडी सळ्या शरीरात घुसल्याने ती जखमी झाली. सध्या तिच्यावर पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कल्याण-डोंबिवलीतील चिंचोळ्या रस्त्यांवरून चालताना समोर आणि पाठीमागून वाहनचालकांनी बेजार करून सोडलेले आहे. त्यात पदपथावरून चालण्याची सोय पालिकेने ठेवलेली नाही. रस्त्यांची कामे कशीबशी आटोपतानाच गटारांची दुरुस्ती धिम्या गतीने सुरू असल्याने ही गटारे उघडीच ठेवण्यात आली आहेत. त्याचा मोठा फटका कल्याणमधील अहिल्याबाई होळकर चौकातून जाताना वृद्धेला बसला.
लोकोबाई सांगळे (७५) असे जखमी महिलेचे नाव आहे. लोकोबाई गुरुवारी दुपारी चौकातून जात असताना रस्त्यावरच्या वाहतूक कोंडीमुळे रस्ता ओलांडताना त्यांचा तोल जाऊन त्या गटारात पडल्या. गटारातून बाहेर आलेल्या लोखंडी सळ्या लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.  नवीन गटारे बांधण्याचे पालिकेचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे कल्याण आणि डोंबिवलीतील नागरिकांचे चालणे मुश्कील होऊन बसले आहे. रस्त्याने चालावे तर वाहनांची भीती आहे आणि सुरक्षा म्हणून पदपथावरून चालावे तर गटारे खणलेली. काही ठरावीक नगरसेवकांनी सुरू केलेल्या या उद्योगांमुळे दोन वर्षांपासून नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. माजी आयुक्त श्यामसुंदर पाटील यांनी उघडय़ा गटारांवर झाकणे नसतील तर संबंधित ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश काढले होते. त्याची प्रशासनाने अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे  अनेक भागांतील पदपथांवरील, गटारांवरील झाकणे ठेकेदारांकडून लावण्यात आलेली नाहीत.