बदलापुरात प्लास्टर, रासायनिक रंगांमुळे पाणी दूषित

बदलापूर पूर्वेकडे असलेल्या गावदेवी तलावात मृत माशांचा खच पडला असून त्यामुळे आसपासच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या तलावात गेल्या अनेक वर्षांपासून गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. त्यामुळेच या तलावातील पाणी प्रदूषित होऊन माशांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बदलापूर पूर्वेतील गावदेवी मंदिराशेजारी असणारा तलाव हा बदलापूरकरांच्या आस्थेचा विषय आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या तलावाशेजारी शंकराचे मंदिर आहे. त्याच्या आसपास अनेक धार्मिक विधी केले जातात. या तलावाचे काही वर्षांपूर्वी सुशोभीकरण करण्यात आले होते. येथे विसर्जन केले जाते आणि निर्माल्यही तलावातच टाकले जाते. यंदाही गावदेवी तलावात दीड दिवस, पाच दिवस आणि सात दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन झाले. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आणि त्यांच्या रासायनिक रंगांमुळे पाणी दूषित होऊन या माशांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

कृत्रिम तलाव उभारण्याची मागणी

यापूर्वीही विसर्जनानंतर मासे मृत आढळल्याचे प्रकार घडले होते. तरीही गावदेवी तलावात विसर्जन होत असल्याने पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत आहे. माशांची दरुगधी पसरल्याने नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. बदलापूर नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने मृत मासे तलावातून बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. या तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याऐवजी शेजारीच कृत्रिम तलाव उभारावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमी करीत आहेत.