वाहनतळांवर प्रवेश नसल्याने सायकलस्वारांची गैरसोय
कल्याण-डोंबिवली शहरात वाहनतळाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी महापालिकेमार्फत युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले असले तरी या वाहनतळांमध्ये सायकली उभ्या करण्यास जागा करून द्यावी, अशी मागणी वाढू लागली आहे. डोंबिवलीहून ठाणे, मुंबई येथे कामानिमित्त जाणारा वर्ग मोठय़ा प्रमाणात आहे. यातील २० ते ३० टक्के नागरिक हे प्रवासासाठी सायकलचा वापर करतात. या सायकलींना हक्काचा असा तळ नाही. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात त्या कुठेही उभ्या केलेल्या दिसतात. महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाबाहेर सायकलींच्या रांगा लागल्याचे चित्र दिसू लागले आहे.
डोंबिवली शहरात मोठय़ा प्रमाणावर चाकरमानी वर्ग आहे. मुंबई येथे कामानिमित्त जाणारे नागरिक रेल्वे स्थानक गाठण्यासाठी आपल्या वाहनांचा उपयोग करतात. यातील २० ते ३० टक्के नागरिक हे सायकलने ये-जा करत असतात. पर्यावरणाला पूरक म्हणून सायकलने सकाळ, सायंकाळ प्रवास करणाऱ्या नागरिकांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या सायकली दिवसभर उभ्या करण्यासाठी मात्र हक्काची जागा शहरात कोठेही नाही. यामुळे सायकलस्वार रामनगर पोलीस स्थानक परिसर, डोंबिवली विभागीय कार्यालय, वाशी बस थांबा यासारख्या ठिकाणी सायकली उभ्या करून कामाला जातात. महापालिकेच्या कार्यालयाबाहेरील पदपथ तर या सायकलींनीच सकाळ, सायंकाळ भरून गेल्याचे चित्र दिसते. एकेकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकालगत या सायकली उभ्या केल्या जायच्या. परंतु तेथे सहावा ट्रॅक झाल्याने तेथून हा थांबा हटविण्यात आला. रेल्वेच्या वतीने पे अ‍ॅण्ड पार्कची सुविधा वाहनांसाठी करण्यात आली. येथे सायकलींना स्थान नाही.

वाहनतळांमध्येतरी मुभा द्यावी
आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असलेले अनेक रहिवासी शहरालगतच्या ग्रामीण भागात राहतात. तेथून रेल्वे स्थानक गाठण्यासाठी त्यांना रिक्षाशिवाय पर्याय नाही. रिक्षाचा खर्चही परवडत नसल्याने अनेक जण सायकलचा वापर करतात. आमची कमाई ही दिवसाच्या धंद्यावर अवलंबून असते. अशा वेळी ती सायकलसुद्धा पैसे देऊन उभी करणे परवडत नाही. मग गावातील चार-पाच जण मिळून या बसथांब्याजवळच रोज सायकल उभी करत असल्याचे दत्तात्रय भारंबे यांनी सांगितले. सायकलींनाही शहरात स्वतंत्र तळ असावे किंवा महापालिकेने त्यांच्या वाहनतळात सायकली उभी करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली जाऊ लागली आहे.