आठ दिवसांपूर्वी लागलेल्या आगीवर नियंत्रण; मात्र धुरामुळे परिसरातील ग्रामस्थांना त्रासू

मुंबईतील देवनार येथील कचराभूमीला लागलेली आग विझवण्यास पडलेले कष्ट  आणि आगीच्या धुराचा परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर झालेला विपरीत परिणाम या घटना ताज्या असतानाच उत्तन येथील घनकचरा प्रकल्पात उघडय़ावर साठवण्यात येणारा कचरा गेल्या आठ दिवसांपासून धुमसत असल्याचे उघड झाले आहे. मीरा-भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग विझवली असली तरी कचऱ्यातून धूर येण्याचे प्रमाण कायम असून त्याचा परिसरातील ग्रामस्थांना मोठा त्रास होत आहे.

मीरा-भाईंदर शहरात दररोज निर्माण होणारा सुमारे चारशे टन कचरा उत्तन येथील धावगीच्या डोंगरावरील प्रकल्पात आणला जातो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून प्रकल्प बंद असल्याने कचऱ्यावर होणारी प्रक्रिया थांबली आहे. परिणामी प्रकल्पाच्या आसपास उघडय़ावरच कचरा साठवला जात आहे. सध्या या ठिकाणी कचऱ्याचे डोंगर निर्माण झाले आहेत. शहरातून जमा होत असलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण केले जात नसल्याने घरगुती कचऱ्यासोबतच औद्योगिक कारखान्यातून निर्माण होणारा कचराही एकत्रितरीत्या या ठिकाणी जमा होतो. त्यामुळे कचऱ्यातून निघणारा विषारी वायू अधूनमधून पेट घेतो. कचरा डोंगरावर असल्याने व बाजूलाच समुद्र असल्याने समुद्राच्या वाऱ्याने हा धूर उत्तन, डोंगरी, तारोडी, आनंदनगर, धारावी आदी गावांत पसरतो. गेल्या आठ दिवसांपासून कचरा पुन्हा एकदा धुमसू लागला आहे. महापालिकेच्या अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवले असले तरी कचऱ्यातून धूर सातत्याने निघत  आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सध्या हवेत असलेले धुक्याचे प्रमाण आणि धूर यांच्या मिश्रणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे.

कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प अधांतरीच

कचऱ्याच्या या त्रासाविरोधात ग्रामस्थांनी  संघर्ष समितीच्या माध्यमातून राष्ट्रीय हरित लवादाकडे दावा दाखल केला होता. त्या वेळी लवादाने मीरा-भाईंदर महानगरपालिकेला कचऱ्यावर त्वरित प्रक्रिया करण्याचे आदेश देऊन कोकण भवन आयुक्तांकडे सत्तर कोटी रुपये भरण्याचे व प्रकल्प वसई तालुक्यात स्थलांतर करण्याचे आदेश दिले होते.  महानगरपालिकेने उच्च न्यायालयातून सत्तर कोटी रुपये भरण्यावर स्थगिती मिळवली, परंतु उच्च न्यायालयानेही प्रकल्पात साठून राहिलेल्या कचऱ्यावर तातडीने प्रक्रिया सुरू  करण्याचे आदेश दिले व यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्थेकडून (आयआयटी) कचऱ्यावर कोणत्या पद्धतीने प्रक्रिया करण्यात यावी याबाबतचे मार्गदर्शन घेण्याच्या सूचना महापालिकेला केल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने आयआयटीला मार्गदर्शन करण्याची विनंती केली. त्यांचे तज्ज्ञही प्रकल्पाला भेट देऊन गेले आहेत, मात्र त्यांचा अहवाल अद्याप महापालिकेकडे आलेला नसल्याने कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची कार्यवाही सुरू  झालेली नाही.