सीसीटीव्ही कॅमेरेही बसवणार
कल्याण, डोंबिवलीत मोठय़ा विकास प्रकल्पांची घोषणा करत महापालिका निवडणुकीपूर्वी ‘स्मार्ट’ खेळी करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ठाणे शहराला येत्या सहा महिन्यांत वायफाययुक्त करू, अशी घोषणा केली.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाणे पोलिसांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी अघोषित बहिष्कार टाकला होता. या पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी वायफाय सीटीची घोषणा केल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. येत्या काळात ठाणे शहरातील विविध भागांत पोलीस आणि महापालिकेच्या माध्यमातून सुमारे १५०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवून हे संपूर्ण शहर पोलिसांच्या नियंत्रणाखाली आणले जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली. संजीव जयस्वाल आणि पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे दोन्ही अधिकारी उत्तम काम करत असल्याचे प्रशस्तीपत्रही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.

ठाणे वाहतूक पोलिसांच्या डिजिटल वाहतूक नियंत्रण कक्षाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी झाला. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जोरदार कलगीतुरा रंगला होता. या पाश्र्वभूमीवर होत असलेल्या कार्यक्रमात हे दोघे नेते एकाच व्यासपीठावर येत असल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
असे असताना या कार्यक्रमास पालकमंत्र्यांसह शिवसेनेचा एकही पदाधिकारी फिरकला नाही. महापौर संजय मोरे यांनीही या कार्यक्रमास येणे टाळल्याने शिवसेनेचा हा अघोषित बहिष्कार असल्याची चर्चा रंगली होती. दरम्यान, कार्यक्रमस्थळी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी चर्चा करत मुख्यमंत्र्यांनी लागलीच वायफाय सीटी आणि १५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची घोषणा केली.

गुन्हे रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर

मुंबई महानगर प्रादेशिक क्षेत्रामध्ये लोकसंख्या वाढली आहे. त्याचबरोबर गुन्ह्य़ांचे प्रकार वाढत आहे. मात्र सद्य:स्थितीत असलेल्या संख्येतच पोलिसांना काम करावे लागत आहे. वाढत्या गुन्ह्य़ांमुळे पोलिसांपुढील आव्हाने आणखी वाढली आहेत. देशातील सर्वात मोठे पोलीस बळ आपल्या राज्याकडे असून सुमारे दोन लाख पोलिसांचा फौजफाटा आहे. पोलिसांची संख्या वाढविण्यासंबंधी काही मर्यादा आहेत. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग गुन्ह्य़ांची उकल तसेच पोलिसांवरील ताण कमी करावा लागेल, असे मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.
येत्या सहा महिन्यांत ठाणे शहरातील विविध भागांत सुमारे १५०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, त्याच्या माध्यमातून पुण्याप्रमाणेच संपूर्ण शहर ई-सव्‍‌र्हेलियन्सखाली आणण्यात येणार आहे, असा दावाही त्यांनी या वेळी केला.
या कार्यक्रमाप्रसंगी ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, आमदार संजय केळकर, वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर, टीजेएसबी सहकारी बँकेचे अध्यक्ष नंदकुमार मेनन, व्यवस्थापकीय संचालक सतीश उत्तेकर, इतर मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.

प्रस्ताव तयार
* ठाणे, कळवा आणि मुंब्रा या तीन शहरांना वायफायने जोडण्याचा र्सवकष असा प्रस्ताव तयार असल्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सांगितले
* ज्या भागात मोबाइल नेटवर्क उपलब्ध आहे तेथे ही सुविधा उपलब्ध होऊ शकते
* संपूर्ण शहरभर ही यंत्रणा उभी करत असताना त्यासोबत सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे
* यासंबंधीचे दोन्ही प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत, असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.