नालासोपाऱ्यात मुख्यमंत्र्यांची प्रचारसभा

वसई विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पालघर लोकसभा पोटनविडणुकीतील भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी रविवारी नालासोपारा येथील सभेत हे आश्वासन दिले. वसईतील २९ गावांना जर स्वतंत्र नगरपालिका हवी असेल तर ती बनवू किंवा त्यांना पुन्हा ग्रामपंचायत हवी असेल तर तशी व्यवस्था करू. वसईतील हरित पट्टा उध्दवस्त होऊ देणार नाही असे आश्वासन दिले.

वसईतील सत्ताधारी बहुजन विकास आघाडीवर त्यांनी नाव न घेता टीकास्त्र सोडले. वसईकरांना सत्ताधाऱ्यांच्या बाजूने मतदान करण्यासाठी धमकी दिली जात आहे. परंतु वसईकरांनी निर्भयतेने मतदान करा, सरकार तुमची काळजी घेईल असे ते म्हणाले. मला कुणी खिशात ठेवू शकत नाही, मला खिशात ठेव शकेल असा खिसा तयार झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. वसईतील सत्ताधारी अनधिकृत बांधकामात गुंतला आहे तर शिवसेनेचा भगवा ध्वज घेतलेले अनधिकृत बांधकामातून खंडणी गोळा करत आहे, अशी टीका त्यांनी केली.

फडणवीस यांनी भाषणात तीन वर्षांत केलेल्या कामाचा आढावा घेतला. वसई विरार शहरासाठी तीनशे दशलक्ष लिटर्सची पाणी पुरवठा योजना आणल्याचा दावा त्यांनी केला. दिवंगत चिंतामण वनगा यांच्या मुलाला उमेदवारी देऊन शिवसेनेने विश्वासघात केल्याचे सांगत , वनगा ही कुणाची खाजगी मालमत्ता नसून तो आमचा विचार असल्याचे सांगितले.