पाणीपुरवठा योजनेचे काम स्थानिक शेतकऱ्यांकडून बंद

मनोर हालोली बोट परिसरात सुरू असलेले सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे खोदकाम स्थानिक शेतकऱ्यांनी बंद पाडले. या कामासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.

वसई-विरार महानगरपालिका, मीरा-भाईंदर महापालिका आणि एमएमआरडीएला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातील स्थानिक, शेतकरी आणि आदिवासींचा तीव्र विरोध आहे. येथील पाणी या ठिकाणी वळवल्यामुळे या प्रकल्पातील सिंचन क्षेत्रातील भागाला याचा मोठा फटका बसला आहे, तसेच हे पाणी मीरा-भाईंदर, वसई-विरार आणि एमएमआरडीएला वळविल्यामुळे हजारो एकर क्षेत्र सिंचनातून बाद झाले आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पावसाळ्यापूर्वी या भागातील मेंढवन, वाडा खडकोना, चिल्हार, नांदगाव येथे या कामास सुरुवात केली होती. मात्र त्यावेळी याला विरोध करत सूर्या पाणीबचाव समितीने जिल्हा बंद आंदोलन तसेच याबाबतीतील विविध आंदोलने केली.

चार महिन्यांनंतर पुन्हा हलोली बोट ग्रामपंचायत हद्दीत हे काम सुरू करण्यात आले. यालाही येथील स्थानिक शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला होता, तरी काम सुरूच होते. त्यामुळे ग्रामस्थांनी या ठिकाणी जाऊन हे काम बंद पाडले. केंद्र शासनाच्या नियमानुसार वनजमिनीत किंवा बिगर वनजमिनीत काम सुरू करण्यापूर्वी परवानगी असणे आणि त्याचे पैसे भरणे बंधनकारक आहे. अशा पद्धतीचे हे काम बेकायदा सुरू असल्याचे इथल्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ज्या शेतकऱ्यांच्या खाजगी जागेतून ही योजना जात आहे, अशा शेतकऱ्यांचा जमिनीचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. त्यासाठी संबंधित प्राधिकरणाची बैठक घ्या, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

४०३ एमएलडी क्षमतेची आणि एक हजार ३०० कोटी खर्चाची सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे. मात्र त्यामुळे स्थानिकांच्या हक्काचे सिंचनाचे पाणी शहरी भागात देण्यात येत आहे. ते पाणी जिथपर्यंत स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांना मिळत नाही. तोपर्यंत ते पाणी इतरत्र जाऊ  देणार नाही.

– रमाकांत पाटील, सूर्या पाणी बचाव संघर्ष समिती

वन विभागाने हे खोदकाम करण्याची कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही. सूर्या प्रकल्पाने ही परवानगी दिलेली नाही, तरी संबंधित प्राधिकरणाच्या ठेकेदाराने बेकायदा कामाला सुरुवात केली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, एमएमआरडीए आणि शेतकऱ्यांची बैठक घेण्यात यावी आणि ग्रामस्थांचे समाधान होत नाही तोपर्यंत काम सुरू करू नये.

– समृद्धी सांबरे, सरपंच, ग्रामपंचायत हलोली