उपमहापौरपदी चंद्रकांत वैती यांची निवड

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपच्या डिम्पल मेहता यांची बहुमताने निवड झाली आहे. डिम्पल मेहता यांनी सोमवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या अनिता पाटील यांचा ६१ विरुद्ध ३४ मतांनी पराभव केला. डिम्पल मेहता या भाजपचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांच्या बंधूंच्या पत्नी आहेत. उपमहापौरपदासाठी भाजपने चंद्रकांत वैती यांना उमेदवारी दिली होती. वैती यांनीदेखील काँग्रेसच्या अनिल सावंत यांच्यावर ६१ विरुद्ध ३४ मतांनी विजय मिळवला. या निवडणुकीसाठी शिवसेना आणि काँग्रेस यांनी युती केली होती.

महापौरपदासाठी सोमवारी दुपारी १२ वाजता निवडणूक आयोजित करण्यात आली होती. ९५ पैकी ६१ जागा जिंकून भाजपने महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवली आहे, त्यामुळे दोन्ही जागांवर भाजपचेच उमेदवार विजयी होणार नक्की होते. या पदासाठी भाजपकडून डिम्पल मेहता यांच्यासह वंदना भावसार असे दोन अर्ज दाखल करण्यात आले होते, तर विरोधी पक्षांकडून शिवसेनेच्या अनिता पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. तीनही उमेदवारांचे अर्ज वैध असल्याचे पीठासीन अधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी घोषित केल्यानंतर भाजपच्या वंदना भावसार यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे डिम्पल मेहता विरुद्ध अनिता पाटील अशी थेट लढत झाली. पीठासीन अधिकाऱ्यांनी मतदान घेण्याचे आदेश देताच शिवसेनेच्या उमेदवार अनिता पाटील यांनी डिम्पल मेहता यांच्या उमेदवारीवर आक्षेप नोंदवला. महापौरपद इतर मागासवर्गीय महिलांसाठी राखीव असल्याने उमेदवार इतर मागासवर्गीय महिलांसाठी राखीव असलेल्या प्रभागातून निवडून येणे आवश्यक आहे का, असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला, परंतु पीठासीन अधिकारी कल्याणकर यांनी निवडणूक नियमानुसारच घेतली जात असल्याचे सांगून पाटील यांचा मुद्दा फेटाळून लावला आणि मतदान घेण्याचे आदेश दिले. निवडणुकीसाठी भाजपकडे ६१ संख्याबळ होते आणि विरोधी पक्षांकडे शिवसेना २२, काँग्रेस १२ आणि अपक्ष २ अशी एकंदर ३४ मते होती. हात उंचावून झालेल्या मतदानात डिम्पल मेहता यांनी अनिता पाटील यांचा पराभव केला.

उपमहापौरपदासाठीही भाजपकडून चंद्रकांत वैती आणि राकेश शहा असे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले होते. काँग्रेस आणि शिवसेना युतीकडून काँग्रेसचे अनिल सावंत यांनी उपमहापौरपदासाठी उमेदवारी दाखल केली होती. भाजपच्या राकेश शहा यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने वैती विरुद्ध सावंत अशी थेट लढत होऊन त्यात चंद्रकांत वैती विजयी झाले.

भाजपचे नगरसेवक विशिष्ट वेशभूषेत

महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या सर्व ६१ नगरसेवकांना रविवारी दुपारी सुरक्षितस्थळी नेण्यात आले होते. निवडणूक १२ वाजता असल्याने सोमवारी सकाळी ११.३० वाजता भाजप नगरसेवक एकत्रितरीत्या महापालिकेत हजर झाले. सर्व नगरसेवकांना या वेळी विशेष पोशाख देण्यात आला होता. भाजपचे नगरसेवक  पांढरा पोशाख आणि डोक्याला भगवा फेटा तर महिला नगरसेविका भगव्या साडय़ा आणि डोक्याला फेटा अशा वेशात सभागृहात दाखल झाल्या. शिवसेना आणि काँग्रेसचे नगरसेवक मात्र कोणताही विशेष पोशाख परिधान न करता निवडणुकीसाठी आले होते. भाजपचा महापौर निवडला जाणार हे स्पष्ट असल्याने भाजप कार्यकर्त्यांनी महापालिकेत एकच गर्दी केली होती. निवडणूक झाल्यानंतर फटाक्यांची एकच आतषबाजी करीत मिठाईचे वाटप केले. ढोल आणि ताशांच्या दणदणाटात या वेळी विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली.

मतदारांनी भाजपला एकहाती सत्ता दिली आहे, त्यामुळे निवडणुकीचा जाहीरनामा तयार करताना भाजपने नागरिकांकडून मागवलेल्या सूचनांपैकी निवडक समस्यांना प्राधान्य देऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

– नरेंद्र मेहता, आमदार